पाकिस्तानच्या हद्दीतून जाणार नाही मोदींचे विमान

45

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कर्गिझस्तानला होणाऱया शांघाई सहकार संघटनेच्या (एससीओ) परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हीव्हीआयपी विमान पाकिस्तानच्या हद्दीतून जाणार नसल्याचे परराष्ट्र खात्याने आज स्पष्ट केले. मोदींचे विमान हे आता ओमान, इराण आणि मध्य आशियातील अनेक देशांतून थेट बिश्केकमध्ये पोहोचणार आहे. कर्गिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये 13 आणि 14 जूनला होणाऱया परिषदेला पंतप्रधान मोदी तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही उपस्थित राहणार आहेत.

‘एससीओ’ परिषदेकरिता पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून विमान नेण्यासाठी हिंदुस्थानने मागितलेल्या परवानगीला पाकिस्तानने मान्यता दिली होती. मात्र, त्यानंतर हा मार्ग न वापरण्याचा निर्णय हिंदुस्थानने घेतला. पुढे आलेल्या दोन पर्यायांपैकी ओमान, इराणमार्गे मोदींचे विमान थेट जाईल, असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले.

पाकिस्तानी हद्दीत हिंदुस्थानी विमानांना बंदी
हिंदुस्थानने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोटमधील दहशतवाद्यांवर हवाई हल्ला केला. ‘जैश-ए-मोहम्मद’चे दहशतवादी तळ नष्ट केले. तेव्हापासून पाकिस्तानने हिंदुस्थानी विमानांना आपल्या हवाई हद्दीतून जाण्यास बंदी घातली आहे. मात्र, एससीओ परिषदेला जाण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या विमानाला थेट पाकिस्तानी हवाई हद्दीतून जाता यावे, यासाठी पाकिस्तानकडे परवानगी मागितली होती. विशेष बाब म्हणून ही मागणी पाकिस्तानने मान्य केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या