देवाकडे मागण्याची माझी प्रवृत्ती नाही; ध्यानधारणेनंतर मोदींची प्रतिक्रिया

157

सामना ऑनलाईन । केदारनाथ

केदारनाथ येथील गुहेत सुमारे 17 तास ध्यान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी बाहेर आले. त्यांनी पूजा अर्चना केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. देवदर्शनाला आल्यानंतर मी देवाकडे काही मागत नाही. देवाकडे मागण्याची माझी वृत्ती नाही. देवाने आपली निर्मिती देण्यासाठी केली आहे, मागण्यासाठी नाही, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या धामधुमीनंतर मला येथे ध्यानधारणा करण्याची संधी मिळाली, त्यामुळे समाधान वाटत असल्याचे ते म्हणाले.

तुम्ही देवाकडे काय मागितले असे विचारल्यावर ते म्हणाले मी देवाकडे काही मागत नाही. देवाकडे मागण्याच्या प्रवृत्तीशी मी सहमत नाही. देवाने आपल्याला देण्यासाठी बनवले आहे. त्यासाठी देवाने दिलेल्या क्षमतांचा वापर करून समाजाला आपण काहीतरी देणे गरजेचे आहे. आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना मनात असणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. भोलेनाथाकडून मानव कल्याणाचा आशिर्वाद मागितल्याचे मोदी यांनी पत्रकारांना सांगितले. केदारनाथच्या विकासासाठी कामे सुरु आहेत.येथील विकासकामांवर माझे कायम लक्ष असते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपण कामांचा आढावा घेत असतो, असे त्यांनी सांगितले. केदारनाथ आणि बद्रीनाथाचे दरवाजे उघडल्यानंतर आपणही दर्शन घ्यावे असे प्रत्येक भाविकाला वाटते. मात्र, त्यासाठी प्रशासनाला खूप तयारी करावी लागते. येथे करण्यात येणाऱ्या कामांची चर्चा होत नाही असे ते म्हणाले. आता प्रसारमाध्यमे येथे आल्याने नागरिकांचे लक्ष वेधले जाईल. जनतेला येथील सोयीसुविधांची माहिती मिळेल. परदेशात पर्यटनाला जाण्याऐवजी जनतेने देशात फिरावे, देशातील विविध ठिकाणांना भेटी द्याव्यात असे आवाहनही त्यांनी केले.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केदारनाथला भेट देत दर्शन घेतले आणि पूजाअर्चना केली. गेल्या दोन वर्षांतील पंतप्रधान मोदींचा हा चौथा केदारनाथ दौरा आहे. ते रविवारी बद्रिनाथलाही भेट देणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ते नवी दिल्लीला परतणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या