मोदींच्या 142 सभा,111 विजय; तर, राहुल यांच्या 129 सभा आणि फक्त 16 विजय

66

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीत खरी रंगत आणली ती प्रचारसभांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या प्रचारसभांना गर्दीही झाली आणि आरोपप्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या गेल्या. मोदींनी देशभरात 50 दिवसांत 142 प्रचारसभा घेतल्या आणि या जागांवर भाजपला 111 ठिकाणी विजय मिळाला. गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचारसभांमुळे त्यांना 99 ठिकाणी विजय मिळाला होता. राहुल गांधी यांनी देशभरात 67 दिवसांत 129 प्रचारसभा घेतल्या आणि त्यांना फक्त 16 जागांवर विजय मिळाला. गेल्या निवडणुकीत या जागांवरील त्यांच्या प्रचारसभांमुळे काँग्रेसने 22 जागा जिंकल्या होत्या.

नरेंद्र मोदी यांनी सर्वात जास्त प्रचारसभा उत्तर प्रदेश घेतल्या. उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी 31 प्रचारसभा आणि पश्चिम बंगालमध्ये त्यांनी 17 प्रचारसभा घेतल्या. राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशमध्ये 18 तर उत्तर प्रदेशमध्ये 17 प्रचारसभा घेतल्या.

मोदींच्या 5 राज्यांत 75 प्रचारसभा, 49 जागा जिंकल्या
मोदी यांनी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल येथे 75 प्रचारसभा घेतल्या. त्यामुळे भाजपच्या पारडय़ात 49 जागा पडल्या. राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, केरळ आणि कर्नाटक या राज्यांत 64 प्रचारसभा घेतल्या. त्यामुळे काँग्रेसच्या पारडय़ात 10 जागा पडल्या.

मोदींच्या 27 तर राहुल यांच्या 26 राज्यांत प्रचारसभा
निवडणूक आयोगाने 10 मार्चला आचारसंहिता लागू गेल्यानंतर 11 मार्चपासून राहुल गांधी यांनी प्रचारसभा सुरू केल्या. त्यांनी सुरुवात दिल्लीपासून सुरुवात केली आणि शेवट हिमाचल प्रदेशमध्ये केला. त्यांनी 67 दिवसांत 26 राज्यांत प्रचारसभा घेतल्या. मोदी यांनी 28 मार्चला मेरठपासून सुरुवात केली तर त्यांची शेवटची प्रचारसभा मध्य प्रदेशमध्ये झाली. त्यांनी 27 राज्यांत प्रचारसभा घेतल्या.

आपली प्रतिक्रिया द्या