नवी मुंबई विमानतळाचा १८ फेब्रुवारीला शिलान्यास समारोह

सामना ऑनलाईन । नवी मुंबई

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबई विमानतळाचे येत्या १८ फेब्रवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन व शिलान्यास होणार आहे. विमानतळाच्या भूमीपूजनासोबतच मोदींच्या हस्ते जेएनपीटीच्या चौथ्या कंटेनर टर्मिनलच्या पहिल्या भागाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. जेएनपीटीचे हे चौथे टर्मिनल देशातील सर्वात मोठे टर्मिनल आहे. या उद्घाटनानंतर मोदींचे भाषणही येथे होणार आहे.

नवी मुंबईचे विमानतळ तयार करण्यासाठी तब्बल सोळा हजार कोटींचा खर्च आहे. सध्या या ठिकाणी प्राथमिक स्तरावर काम सुरू असून भूमीपूजनानंतर या कामाला वेग येईल. ” सध्या विमानतळाच्या जागेवर असलेला डोंगरमाथा फोडण्याचे काम सुरू आहे. त्याच सोबतीने आमचा तांत्रिक विभाग देखील कामाला लागाला आहे.विमानतळाच्या पहिल्या फेजमध्ये विमानतळाची इमारत, साडेतीन किलोमीटरचा रनवे तयार करण्यात येणार आहे. या विमानतळाचे काम पूर्ण होण्यास १८ महिन्यांचा कालावधी लागणार असून डिसेंबर २०१९ किंवा जानेवारी २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.”असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गागरानी यांनी सांगितले.

साडेतीन हजार नागरिकांना स्थलांतरीत करणार
नवी मुंबईतील उल्वे येथे तब्बल ११६० हेक्टरमध्ये हे विमानतळ उभारण्यात येणार असून त्यासाठी लवकरच त्या ठिकाणची १० गावातील साडे तीन हजार नागरिकांना स्थलांतरीत करण्यात येणार आहे. या नागरिकांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात योग्य रक्कम दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.