मोदींच्या भावाचा व्यवसायही अजून कॅशलेस नाही!

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीची घोषणा केली आणि संपूर्ण देशात कॅशलेस अर्थव्यवस्थेवर जोर देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. मात्र प्रत्यक्षात कॅशलेस व्यवहारात अडचण असल्याची मोदींच्या भावाचेच म्हणने आहे. हा प्रकार म्हणजे ‘दिव्या खाली अंधार’ म्हणण्यासारखी परिस्थिती आहे, अशी चर्चा सुरू आहे.

‘इकनॉमिक टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार प्रल्हाद मोदी हे नरेंद्र मोदींचे भाऊ अहमदाबाद येथे ‘फेअर प्राईज शॉप’चे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे देखील एक दुकान आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार देशात कॅशलेस अर्थव्यवस्था उभी राहण्यास बराच काळ जाईल. ‘आमच्याकडे अद्याप स्वाईप मशीन आलेले नाहीत. ते मशिन आल्यानंतर त्याचे भाडे द्यावे लागेल, तसेच प्रत्येक व्यवहारावर सर्व्हिस चार्ज देखील लागतो. आमच्यासारख्या कमिशनच्या आधारावर चालणाऱ्या उद्योगांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागेल’, असे प्रल्हाद मोदींनी सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे. तसेच स्वाईप मशिन वापरावरील सर्व्हिस चार्ज हटवावे किंवा ते बँकांनी भरावे, असे आम्ही सरकारला सांगत आहोत, असेही ते म्हणाले.

आपल्या दुकानात स्वाईप मशिन, पीओएस मशिन किंवा डिजिटल वॉलेटसारख्या सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले. अद्याप कोणतेही ग्राहक ई-वॉलेटने व्यवहार करण्यास आपल्याकडे आला नाही, असे त्यांनी सांगितले. ‘लोक आता पीओएस मशिन लावण्याची तयारी करत आहेत. तर अनेकांनी बँकांमध्ये चालू खाते तयार केले आहेत’, असेही ते म्हणाले. ‘आमचा व्यवहार हा रोकडीवर आधारित असल्याने ग्राहक थोडे पैसे घेऊन येतात’, असेही त्यांनी स्पष्ट केले.