लोकसभेत राफेलवरून तर राज्यसभेत हसण्यावरून गोंधळाची शक्यता

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

लोकसभा आणि राज्यसभेत आज पुन्हा एकदा काँग्रेसचे खासदार आक्रमक होण्याची शक्यता आहे. राफेल विमानं खरेदी करारावरून राहुल गांधी हे सातत्याने भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. आज राहुल गांधी पुन्हा एकदा लोकसभेत बोलण्याची शक्यता आहे. आम्ही भाजप सरकारला या सौद्यावरून ३ प्रश्न विचारले आहेत मात्र त्याची सरकार उत्तरे देत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. दुसरीकडे रेणुका चौधरी यांच्या गगनभेदी हसण्यावरून पंतप्रधानांनी केलेल्या विधानामुळे राज्यसभेत त्या आक्रमक होण्याची शक्यता आहे. चौधरी यांनी राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांना हक्कभंगाची नोटीस दिली असून मोदींच्या विधानामुळे महिलांचा अपमान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

राहुल गांधी यांनी राफेल सौद्यावरून सरकारला प्रश्न विचारले आहेत की कोणत्या दराने या विमानांची खरेदी करण्यात आली? खरेदी करण्यापूर्वी मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीला याबाबत विचारण्यात आलं होतं का ? आणि हिंदुस्थान एरोनॉटीक्स लिमिटेड या कंपनीऐवजी एका उद्योगपतीला खरेदीचं कंत्राट का देण्यात आलं ?

राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी गुरुवारी अर्थमंत्री अरूण जेटली पुढे आले होते. जेटलींनी सभागृहात सांगितलं की  राष्ट्रीय सुरक्षेच्या हितामुळे ‘राफेल’सारख्या करारांची माहिती सार्वजनिक करता येत नाही. याबाबत काँग्रेस अध्यक्षांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन धडे घ्यावेत. प्रणवदांकडून काही तरी शिकावे असा टोला जेटली यांनी लगावला.

प्रणव मुखर्जी जेव्हा संरक्षणमंत्री होते तेव्हा अमेरिकेकडून शस्त्रास्त्र खरेदी केले होते. राष्ट्रीय सुरक्षेच्या हितामुळे कराराची माहिती सार्वजनिक करता येत नाही असे प्रणवदा म्हणाले होते. ए. के. ऍण्टोनी जेव्हा संरक्षणमंत्री होते तेव्हाही इस्रायलबरोबर झालेल्या शस्त्रास्त्र खरेदी कराराची माहिती जाहीर केली नव्हती. जेव्हा असे करार होतात तेव्हा सर्व माहिती जाहीरपणे सांगितली जात नाही. कराराची सर्व माहिती जगजाहीर झाल्यास शत्रूंना शस्त्रांची प्रणाली आणि क्षमतेची माहिती मिळते. काँग्रेस अध्यक्षांना पुढे याबाबत काही माहीत नसेल. त्यांनी प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन धडे घ्यावेत, काहीतरी शिकावे असे जेटली यांनी फटकारले.