शरीराचा प्रत्येक कण देशवासीयांसाठी, पंतप्रधान मोदी यांचे भावोद्गार

8

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आजचा विजय कुठल्या पक्षाचा, नेत्याचा नसून देशाचा आहे. आज हा देश विजयी झाला आहे. हिंदुस्थानची लोकशाही विजयी झाली आहे. माझ्या कार्यकाळातला प्रत्येक क्षण, माझ्या शरीराचा प्रत्येक कण देशवासीयांसाठी असेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

भाजपच्या जबरदस्त विजयानंतर पक्ष मुख्यालयात पंतप्रधान मोदी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, 2019च्या निवडणुकीसाठी, नव्या हिंदुस्थानसाठी जनादेश घेण्याकरिता गेलो होतो. देशातील कोटी कोटी नागरिकांनी या फकिराची झोळी भरली, असे पंतप्रधान म्हणाले.

जनतेने देशासाठी मतदान केले
महाभारताचे युद्ध समाप्त झाले तेव्हा श्रीकृष्णाला विचारले होते, तुम्ही कोणाच्या बाजूने होतात. श्रीकृष्णाने उत्तर दिले, मी हस्तीनापूरच्या बाजूने होतो. तेच उत्तर आज देशाच्या जनतेने दिले आहे. जनता हिंदुस्थानसाठी उभी होती. देशासाठी मतदान केले. आज कोणी विजयी झाले असेल तर देश विजयी झाला आहे. लोकशाही विजयी झाली आहे. देशाच्या 130 कोटी नागरिकांचे मी माथा झुकवून नमन करतो, अशा शब्दांत मोदींनी जनतेचे आभार व्यक्त केले.

वाईट हेतूने काहीही करणार नाही!
2014नंतर 2019मध्ये पुन्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात. माझी जबाबदारी वाढली आहे. ‘एनडीए’च्या घटक पक्षांनी माझी मदत केली आहे. मी वाईट नियतीने, वाईट हेतूने कुठलेही काम करणार नाही. माझ्या कार्यकाळातला प्रत्येक क्षण, शरीराचा प्रत्येक कण देशावासीयांसाठी असेल. काम करताना चूक होऊ शकते. चुकलो तर सांगा, टीका करा असे मोदी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या