Mission Tag मोदींनी राहुल गांधी-ममता-शरद पवारांना केलं टॅग; सोशल मीडियावर चर्चा

modi-final

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संसदेत, निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांवर तुटून पडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलवरून आज एक असे ट्वीट पडले ज्यात साऱ्या प्रमुख विरोधकांना टॅग करण्यात आले होते. हे ट्वीट पडल्यानंतर जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र हे ट्वीट टीकेचे नाही तर मतदानाविषयी मतदारांना जागरुक करण्यासाठी केलेले आवाहन होते.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या वैयक्तिक ट्वीटर हँडलवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बसप अध्यक्ष मायावती, सपचे नेते अखिलेश यादव, राजदचे नेते तेजस्वी यादव आणि डीएमकेचे प्रमुख एमके स्टॅलीन यांना ट्वीट टॅग केले आहे. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदारांना मतदान करण्यासाठी आपण सर्वांनी प्रेरित करावे असे आवाहन मोदींनी यावेळी केले आहे. यावर सोशल मीडियावरून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

तरुणांना प्रेरित करण्यासाठी आदित्य ठाकरेंना केले टॅग

एनडीएमधील भाजपचा सगळ्यात मोठा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना देखील मोदींनी टॅग केले आहे. तरुणांना मतदानासाठी प्रेरित करा असे आवाहन त्यांनी या ट्वीटमध्ये केले आहे.

या ट्वीटमध्ये त्यांनी चिराग पासवान आणि हरसिम्रत बादल यांना देखील टॅग केले आहे. तसेच देशभरातील उद्योगपती, अध्यात्मिक क्षेत्रातील प्रमुख, सेलिब्रिटी, सामाजिक क्षेत्रातील मंडळी यासाऱ्यांना देखील त्यांनी टॅग करून मतदारराजाला जागरुक करण्याचे आवाहन केले आहे.