‘या’ देशातल्या नागरिकांना मोदी २०० गायी भेट म्हणून देणार!

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन आफ्रिकेच्या दौऱ्यावर निघणार आहे.  सगळ्यात पहिले रवांडा नावाच्या एका छोट्याशा देशात उतरणार आहेत. या देशाची लोकसंख्या ही दिल्लीपेक्षा कमी आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी आपल्या या भेटी दरम्यान २०० गायी भेट म्हणून देणार आहेत.

‘गिरिंका’ उपक्रमाअंतर्गत देशातील पूर्वेकडील भागातून या गायी खरेदी करण्यात येणार आहेत. प्रत्येक कुटुंबाला एक गाय भेट म्हणून देण्यात येईल. त्यानंतर गोवंश प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक कुटुंबाने आपल्या आसपासच्या कुटुंबाला ते गोवंश द्यायचं आणि त्या कुटुंबाने त्याचा सांभाळ करायचा असा हा उपक्रम आहे. यामुळे प्रत्येक कुटुंबाला उदरभरणाचे एक साधन मिळेल. गरीब परिवाराला दूध घरच्या घरी उपलब्ध होईल, असा विचार यामागे करण्यात आला आहे.

दरम्यान, हिंदुस्थानच्या पंतप्रधानांच्याआधी चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग यांनी देखील रविवारी रवांडा येथे हजेरी लावली होती. हा देश छोटा असला तरी मेट्रो शहरांची व्यवस्था कशी असावी याचा आदर्श या देशाच्या राजधानी किगलीकडून घेता येऊ शकतं, असं म्हटलं जातं. त्यामुळे विविध देशांचे प्रतिनिधी येथे हजेरी लावत असल्याचं सांगण्यात येतं.