मोदी पलटले… आता विचारतात, उशीर का केलात?

फोटो: पीटीआय

सामना ऑनलाईन । मुंबई

पाचशे आणि हजार रुपयाच्या जुन्या नोटा बदलायला ३० डिसेंबरपर्यंत पन्नास दिवसांचा अवधी आहे, घाई करू नका, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर करताना सांगितले होते. अजून ही मुदत संपायला दहा दिवस शिल्लक आहेत. मात्र नोटा बदलायला गेलेल्या नागरिकांना ‘एवढा उशीर का केला?’ अशी विचारणा आता होऊ लागली आहे. इतकेच नव्हे, तर त्यांना शंभर कागदपत्रे सादर करण्याची सक्ती केली जात आहे.

८ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केली. त्यानंतर जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकांबाहेर लांबच लांब रांगा लागू लागल्या. पन्नास दिवस आहेत ना, मग कशाला घाई करावी असा विचार करून अनेकांनी अद्याप नोटा बदललेल्या नाहीत. आता गर्दी कमी झाल्याने आपल्या जुन्या नोटा घेऊन बँकेत जाणार्‍या नागरिकांना मात्र जास्तच त्रास सहन करावा लागत आहे.

सागर हे बँकेत त्यांच्याजवळच्या एक हजार रुपये मूल्याच्या २५ नोटा बदलायला गेले होते. त्यासाठी त्यांना फॉर्म भरण्याबरोबरच विविध स्वरूपाच्या कागदपत्रांच्या शंभर प्रती सादर कराव्या लागल्या.

नोटा बदलताना आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल नागरिक ‘ट्विटर’ या सोशल नेटवर्किंग साईटवरून नाराजी व्यक्त करू लागले आहेत. सागर नावाच्या एका नागरिकाने त्याला नोटा बदलण्यासाठी भराव्या लागलेल्या बँकेच्या फॉर्मचा फोटोच ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यात सतरा प्रश्‍न विचारले गेले आहेत. ‘नोटा बदलायला एवढा उशीर का झाला?’ असा धक्कादायक प्रश्‍नही त्यात विचारला गेला आहे.