प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पात्र-अपात्रतेच्या विळख्यात

42
प्रतिकात्मक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । परभणी

शेतकर्‍यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर वार्षिक 6 हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारने 1 फेब्रुवारी रोजी घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविताना अनेक नियम व अटी असल्याने कुटुंबाची व्याख्या ठरवणे कठीण होऊन बसले आहे. अनेक अधिकारी आणि कर्मचारी पात्र-अपात्र बाबतीतच्या निकषाबाबत अनभिज्ञ आहेत. नियम आम्हालाच समजेना आम्ही काय सांगणार? असा सवाल उपस्थित केल्या जात आहे. एकंदीरतच बदलत्या सुचना असल्यामुळे पात्र-अपात्र बाबतीत निश्चित निर्णय घेणे कठीब बाब होऊन बसले असून शेतकर्‍यांच्या याद्या तयार करताना कोणत्या आधारावर करण्याचे निर्देश आहेत. याबाबतीत संदिग्धतता निर्माण झाल्याने ही योजना पात्र-अपात्रतेच्या विळख्यात सापडली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

अवघ्या चार दिवसात शेतकर्‍यांच्या नावाची यादी तयार करण्याच्या सुचना तलाठी, ग्रामसेवक, सचिव व अन्य अधिकारी व कर्मचार्‍यांना देण्यात आल्याने चांगलीच तारांबळ उडाली आहे. अनेकांच्या जमिनीची फोड करण्यात आली आहे. परंतु ही वाटणी मानधन देण्यासाठी पात्र आहे की नाही? याबाबत ठोस निर्णय अद्यापही अंमलात आला नाही. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत 2  हेक्टरपर्यंतची शेती असणार्‍या शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वार्षिक 6 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. आता मात्र याचा लाभ केवळ एका शेतकरी कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकर्‍यांच्या याद्या तयार करताना याच आधारावर त्या करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शेतकर्‍यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता व त्यांना आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकारने अर्थ संकल्पात ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केली आहे. दोन हेक्टरपर्यंत जमीन असणार्‍या शेतकर्‍यांना बँक खात्यावर तीन टप्प्यात ६ हजार रुपये जमा केले जाणार आहेत. याचा पहिला हप्ता 2 हजार रुपयांचा मार्च महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात जमा केला जाणार आहे. दुसरा हप्ता एप्रिल व तिसरा हप्त जुन महिन्यात दिला जाणार आहे. एकीकडे लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून मार्च महिन्यात केव्हाही अचारसंहिता लागू शकते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्त जमा व्हावा, यासाठी सरकारी कर्मचारी आहोरात्र परिश्रम करत आहेत.

ही योजना अनेक नियम व अटींच्या अधीन असल्याने यादीमध्ये कोणाचे नाव समाविष्ट करायचे आणि कोणाचे करायचे नाहीत? याबाबतीत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आई, वडिल आणि 18 वर्षाआतील मुलगा-मुलगी अशी कुटुंबाची व्याख्या मान्य करण्यात आली आहे. तर आई, वडिल यांचे एक कुटुंब आणि 18 वर्षावरील जेवढी मुले आहेत. त्यांची वेगवेगळी कुटुंबे मानली जातील. मग त्यांचा विवाह झालेला असो अथवा नसो. त्याचबरोबर आईचे स्वतंत्र कुटुंब आणि दोन मुलांची दोन स्वतंत्र कुटुंबे अशा तीन कुटुंबांना लाभ मिळणार आहे. दोन गावामध्ये शेतजमीन असल्यास दोन्ही गावातील मिळून जमीन 2 हेक्टर असल्यामुळे हे कुटुंब लाभ मिळण्यास पात्र ठरेल. प्रत्येक कुटुंब हा घटक वेगळा पकडायचा असल्यामुळे या ठिकाणी सर्व 12 कुटुंबांना लाभ मिळेल. अनेक नियम व अटींच्या विळख्यात ही योजना राबविण्यात येत असल्याने आणि अधिकारी आणि कर्मचारी हेच पात्र-अपात्र बाबतीत अवघ्या चार दिवसात निर्णय घेण्यासाठी अनभिज्ञ असल्याने ही योजना पात्र-अपात्रतेच्या विळख्यात सापडली आहे.