अवघी पंढरी गजबजली, दर्शनाला लांबच लांब रांगा

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

आषाढी वारीचा सोहळा अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. विविध राज्यातून निघालेला पालखी आणि दिंडी सोहळा पंढरीत दाखल होत असल्याने विठूची नगरी वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे गजबजून गेली आहे. दाखल झालेले भाविक चंद्रभागेचे स्नान करून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी करीत असल्याने देवाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर पत्राशेडमध्ये पोहचली आहे. या दर्शन रांगेत दीड लाखाहून अधिक भाविक उभे असून दर्शनासाठी १२ तासांचा वेळ लागत आहे.

vari-darshan
विठूरायाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा

आषाढी एकादशीच्या पर्वणीवर श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला अनन्य साधारण महत्व आहे मात्र त्यावेळी दर्शन रांग मंदिरापासून दहा किलोमीटर पर्यंत दूर जाते आणि दर्शनासाठी ३० तासांहून अधिक वेळ उभे राहावे लागते. त्यामुळे वारीपूर्वी आलेले वारकरी भाविक चंद्रभागेचे दर्शन करून श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी आतापासूनच गर्दी करीत आहेत.

vari-kirtan
किर्तनामध्ये गुंग झालेले वारकरी

विठ्ठलाच्या दर्शनासाठीची रांग संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपाचे पाच मजले भरून गोपाळपूर पत्राशेडमध्ये पोहचली आहे. सध्या दर्शनरांगेत दीड लाखाहून अधिक भाविक उभे असून दर्शनासाठी १२ तासांचा अवधी लागत आहे. तर मुखदर्शनसाठी तीन तास लागत आहेत. रांगेतील वारकरी भक्तांना तत्पर आणि सुलभ दर्शन मिळण्यासाठी मंदिर समितीचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.