नीरव मोदीविरोधात ‘ईडी’कडून आरोपपत्र

सामना ऑनलाईन । मुंबई 

पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १३ हजार कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात ‘ईडी’ अर्थात सक्तवसुली संचालनालयाने आरोपपत्र दाखल केले आहे. आर्थिक घोटाळा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोदीविरोधात  तब्बल १२ हजार पानांचे आरोपपत्र  दाखल करण्यात आले आहे. याआधी सीबीआयने मोदीविरोधात दोन आरोपपत्र दाखल केली आहेत.

आरोपपत्रात नीरव मोदी, त्याचे सहकारी आणि बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करणाऱ्या बँकेच्या अधिकाऱयांची नावे असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. दरम्यान, ‘ईडी’ मोदी आणि मेहुल चोक्सीविरोधात दुसरे आरोपपत्रही दाखल करण्याच्या तयारीत असल्याचेही अधिकाऱयांनी स्पष्ट केले.  १४ फेब्रुवारी रोजी मोदीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. परदेशात पळून गेलेल्या मोदीविरोधात सीबीआयकडून दोन आरोपपत्रे दाखल होईपर्यंत ‘ईडी’ने याप्रकरणी चौकशी सुरू केली नव्हती. पीएनबीकडून मोदीविरोधात  १३ हजार कोटींच्या घोटाळय़ाप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हे प्रकरण प्रकाशझोतात आले.

१७ डमी कंपन्यांना पुरवला निधी

नीरव मोदीच्या तब्बल १७ डमी कंपन्यांना लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या माध्यमातून पीएनबी बँकेकडून कर्जापोटी ६ हजार ४०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. या कंपन्या किंवा आस्थापना हाँगकाँग, दुबई आणि अमेरिकेत २०११ पासून आहेत. आयात आणि निर्यात असा व्यवसाय असल्याचे दाखवण्यात आले. दरम्यान, या डमी कंपन्यांमध्ये मोदीच्याच फायरस्टार आणि इतर कंपन्यांमधील कर्मचारी डमी संचालक म्हणून काम करत होते असे आरोपपत्रात म्हटले आहे.

ईडीच्या आरोपपत्रात २४ जणांची नावे

‘ईडी’च्या आरोपपत्रात एकूण २४ आरोपींची नावे आहेत. यात नीरव मोदीसह त्याचे वडील दीपक मोदी, भाऊ निशाल मोदी, बहीण पूर्वी मोदी, जावई मयंक मोदी आणि मेसर्स सोलर एक्स्पोर्टस्, स्टेलर डायमंडस् आणि डायमंडस् आर. यूएस या कंपन्यांमधील कर्मचाऱयांचा आणि बँक अधिकाऱयांच्या नावांचा समावेश आहे.