दशक्रिया विधीत चोरट्यांनी केली हातसफाई 

सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर 
श्रीरामपूर शहरातील चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी थेट दशक्रिया विधीसाठी जमलेल्या नागरिकांचे पाकिटमारी करून हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तर शहरात अनेक ठीकाणी  घरफोडी, मोबाईल चोरी, सोनसाखळी चोरी, दुकानांमध्ये लूट अशा घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे पालिसांचा धाक राहिला नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील नॉर्दन ब्रँच येथे गोरख मुंडलिक यांच्या दशक्रिया विधीसाठी मोठ्या संख्येने जनसमूदाय उपस्थित होता. यावेळी नगरसेवक दिलीप नागरे यांचे पाकिट मारण्यात आले. तसेच नगरचे सराफ व्यावसायीक विजय कुलथे यांचा मोबाईल, पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी पानसरे यांच्या खिशातून रोख रक्कम, तसंच अनेकांचे खिसे कापण्यात आले. त्यामुळे  दशक्रिया विधीमध्ये झालेल्या चोरिच्या घटनांची शहरात मोठी चर्चा आहे.
तसेच शहरातील अमित सोनवणे यांचे घर फोडून 14 तोळे सोने आणि 20 हजार रूपयांची रोकड लंपास केली. त्याचप्रमाणे ग्रामिण भागातही चोऱ्या, घरफोड्या आणि लुटमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.