पोद्दार रुग्णालयाच्या वसतिगृहात राहण्यास बंदी

सामना ऑनलाईन । मुंबई

वरळी येथील पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयात इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टर विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहण्यास बंदी घालण्यात आली आहे. महाविद्यालय प्रशासनाने हा फतवा काढला असून या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये तीक्र नाराजी पसरली आहे. प्रशासनाच्या मुजोरीविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून ३०० डॉक्टर यात सहभागी झाले आहेत.

वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आणि सरकारी रुग्णालयात इंटर्नशिप करणाऱ्या निवासी डॉक्टारांना रुग्णालयाच्या वसतिगृहात राहता येते. पण प्रशासनाने प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहता येणार नाही, असा फतवाच काढला आहे. पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयात परवडणाऱ्या दरात शिक्षण मिळत असल्याने सोलापूर, संभाजीनगर, कोल्हापूरातून ते थेट मणिपूर, नेपाळमधूनही विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता महाविद्यालयाने हा निर्णय घेतला. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारातच आंदोलन सुरू केले आहे.

महाविद्यालय प्रशासनाची मुजोरी
आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ९ फेब्रुवारीपासून वसतीगृह रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशाविरोधात विद्यार्थ्यांनी अधिष्ठातांची भेट घेतली पण त्यांनी अद्यापही कोणतीही कारवाई केली नाही.

विद्यार्थ्यांच्या मागण्या
वसतिगृहाची क्षमता केकळ ६४ विद्यार्थ्यांची आहे. परंतु पहिल्या वर्षात १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे.
इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना पैसे भरूनही वसतिगृह खाली करण्याचे आदेश दिले आहेत.
भटक्या जाती आणि जमातीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे वसतिगृहात राहता येणार नसल्याचा अधिष्ठातांचा आदेश आहे.
पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांना शवविच्छेदनाच्या प्रशिक्षणासाठी अजूनही शवाची व्यवस्था झालेली नाही.

इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांचे आंदोलन, आम्ही कुठे जायचे?
अचानक वसतीगृहाबाहेर काढल्याने आम्ही कुठे जाणार? आम्हाला इंटर्नशिपच्या ऑर्डरही देण्यास नकार दिला गेला आहे. आधी वसतीगृह खाली करा, नंतर ऑर्डर देऊ, असे अधिष्ठाता सांगतात. आम्ही करायचे तरी काय?
– आंदोलक विद्यार्थी

यूजीसीच्या सूचनेनुसारच आदेश
रॅगिंगच्या घटना रोखण्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात ठेवू नये अशा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना आहेत. त्यानुसार परीक्षेपूर्वीच ते आदेश दिले गेले होते. कोणत्याही विद्यार्थ्याला अचानक बाहेर काढले गेलेले नाही.
– डॉ. गोविंद खाटी, अधिष्ठाता

शताब्दीत रक्ताचा तुटवडा
कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. A+ (A-Positive) आणि AB+ (AB-Positive) या दोन रक्त गटांचा रुग्णालयात तुटवडा आहे. त्यामुळे शताब्दी रुग्णालय प्रशासनाने मुंबईतील सर्व ब्लडबँकांना पत्र पाठवले असून व्हॉट्सऍपच्या माध्यमातून रक्तदाते वाढवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

उन्हाळा सुरू झाला की रक्ताची कमतरता दुपटीने जाणवू लागते. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असल्याने रक्तदाते शहराच्या बाहेर जातात. पण यंदा फेब्रुवारीमध्येच रक्ताची टंचाई जाणवत आहे. रक्तगटांचा तुटवडा असल्याने याचा त्रास रुग्णांना होऊ नये यासाठी, शताब्दी रुग्णालयाच्या ब्लडबँकचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नवनाथ जाधव यांनी मुंबई शहरातील सर्क ब्लडबँकांना पत्र लिहिले असून रक्तगटांची मागणी केली आहे. ‘रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये सध्या ‘O’ पॉझिटिव्हच्या २० बॅगा आणि ‘B’ पॉझिटिव्हच्या १३ बॅगा आहेत.