‘क : विमुक्ता’मध्ये कवयित्रींचा आवाज

कोमसाप युवाक्तीमधून विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि साहित्याची आवड लागण्यासाठी प्रा. दीपा ठाणेकर आणि सहकारी हे रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयात वाचन कट्ट्य़ामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवीत आहेत. कोमसाप युवाशक्ती आयोजित आणि कोलाज यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी २५ मार्च रोजी एक वेगळा प्रयोग सायंकाळी ४.३० वा सेमिनार हॉल रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय घाटकोपर (प) येथे करण्यात येत आहे. ‘क : विमुक्ता – कवितेतली ती, तीच कविता’ या कार्यक्रमातून स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद यापलीकडे स्त्रीची असलेली विमुक्ती तिच्या कवितेतून जाणून घेण्याचा हा एक अनोखा प्रयत्न केला जाणार आहे. संकेत म्हात्रे, पंकज दळवी, गीतेश शिंदे हे कवी कोलाज संस्थेतर्फे कवितेची एक नवी चळकळ उभी करू पाहत आहेत.

आतापर्यंत ‘क’मधून जेष्ठ कवी अरुण म्हात्रे, अशोक नायगावकर यांच्या कधीही न ऐकलेल्या, कधीही न वाचलेल्या कविता सादर करण्यात आल्या असून या वेळी दोन्ही संस्थांच्या प्रयोगशील कामातून एका वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ कवयित्री सिसिलिया कार्व्हालो, अनुपमा उजगरे, जयश्री हरी जोशी, प्रतिभा सराफ, योगिनी राऊळ या आजच्या कवितांबद्दल भाष्य करत आपल्या कविता सादर करतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वीणा सानेकर करणार आहेत. या कार्यक्रमात कोमसाप युवाशक्तीतील काही युवाही त्यांना आवडलेल्या कवयित्रींच्या, कवींच्या वा स्वरचित कविता वाचतील. सदर कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन कोमसापतर्फ करण्यात आले आहे.