लैंगिक छळ केल्याप्रकरणी कवीवर आरोप

सामना ऑनलाईन । मुंबई

सोशल मीडियावर केलेल्या चॅटिंगच्या माध्यमातून लैंगिक छळ केल्याचा आरोप एका तरुणीने शमीर रुबेन नावाच्या तरुणावर केला आहे. हा तरुण सोशल मीडियाच्याच माध्यमातून कवी म्हणून प्रसिद्धीला आला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, सकिना बूटवाला या तरुणीने अन्य काही महिलांच्या सोबतीने रुबेनविरोधात लैंगिक छळाची तक्रार केली आहे. त्या सर्व महिलांच्या म्हणण्यानुसार २०१३ ते २०१६ दरम्यान रुबेन त्यांच्याशी सोशल मीडियावर चॅट करत होता. त्या चॅटवर तो त्यांना अश्लील संभाषण करण्यास भाग पाडत होता. तसंच अश्लील फोटोची मागणीही करत होता. यातील काही स्त्रियांनी त्याच्यासोबत भेटीवेळीही त्याने अश्लील कृत्य केल्याचा आरोप केला आहे.

यातील मुख्य फिर्यादी सकिना हिच्या म्हणण्यानुसार, रुबेनशी माझी ओळख २०१५मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. मी त्यावेळी सोळा वर्षांची होते. रुबेन माझ्याशी चॅटिंग करताना बऱ्याचदा लैंगिक शब्दांचा वापर करत असे. मला ते आवडत नव्हतं तरीही त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं. पण, जेव्हा लैंगिक छळाविरोधात सुरू असलेल्या मीटू या कॅम्पेनच्या अनुषंगाने रुबेन याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. त्यावेळी त्याच्या दुटप्पीपणाची मला चीड आली. म्हणून मी त्याचा ढोंगीपणा जगासमोर आणायचं ठरवलं आणि मला यात त्याच्या विकृतीला बळी पडलेल्या अजून ३० जणींची साथ मिळाली, असं सकिना हिचं म्हणणं आहे.

दरम्यान, रुबेनने आपल्यावरील आरोपांचं खंडन केलं आहे. मी प्रत्येक स्त्रीचा आदर करतो. माझ्याकडून बोलल्या गेलेल्या शब्दांचा विपर्यास करण्यात येत आहे, यापेक्षा जास्त मी काहीही बोलू शकत नाही. मी माझ्या फेसबुक पोस्टमधून माझं म्हणणं मांडलं आहे. ती पोस्ट हाच माझा या प्रकरणातला जबाब आहे.