पोळा सणावर दुष्काळाचे सावट


सामना ऑनलाईन । उंडणगाव

वर्षभर राबराब राबणाऱ्या बैलांच्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत असून, खरेदी-विक्री नसल्याने बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असूनही निरुत्साह दिसून येत आहे.

शेतात कष्ट करणाऱ्या सर्जा-राजाचा पोळा सण रविवार, ९ सप्टेंबर रोजी आहे. वर्षभर राबराब राबणाऱ्या बैलांची एक दिवस आधी आंघोळ घालून पोळा सणांच्या दिवशी रंगबेरंगी सजवून पूजा करतात. मात्र यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून अपवाद वगळता तीन महिन्यांत एकही दमदार पाऊस पडला नाही. भुरभुर पाण्यावरच खरिपाचे पिके कशीबशी जगली आहेत.

सर्जा-राजाला सजविण्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. दोन दिवसांवर सण आला असला तरी बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. पाऊस चांगला पडला तर शेतकरी उत्साहाने व आनंदाने पोळा सण साजरा करतात. यंदा मात्र तसे चित्र नाही. ग्रामीण भागात भरणाऱ्या आठवडी बाजारातही शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. पोळ्यासाठी बैलांना घुंगरमाळ, गोंडे, हार, कवडांची माळ, खुटडोर, नाथा, कवडी मोरखी, केसरी, हिंगूळ, रंग आदी खरेदी करतात. यंदा मात्र कशालाच उठाव नाही.

खांदे मळणीसाठी पाणीच नाही
यंदा पडलेल्या भुरभुर पाण्याने उंडणगाव परिसरातील एकाही लघू तलाव, विहिरीमध्ये पाण्याचा थेंबसुध्दा आला नाही. नदी, नाले, तलाव, विहिरी या कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे या भागात आतापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे बैलांना नेमकी कुठे आंघोळ घालावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.