हॉटेल-बारच्या शटर डाऊनमुळे, पोळीभाजी केंद्र, वडापाव स्टॉल हाऊसफुल्ल

सामना प्रतिनिधी । ठाणे

मामलेदारची चमचमीत मिसळ असो का ‘तंबी’चा डोसा….फिशलॅण्डचे कुरकुरीत बोंबील फ्राय असो का हेमंतची झणझणीत ‘चिकन थाळी’ या सर्वच पदार्थांच्या नुसत्या आठवणीने ठाणेकरांना आज फक्त आवंढा गिळावा लागला. अग्निशमन दलाच्या जाचक अटींविरोधात हॉटेल व बारमालकांच्या सुरू असलेल्या बेमुदत संपामुळे खवय्यांवर ही वेळ ओढावली असून हॉटेलचे ‘शटर डाऊन’ पाहून अखेर उपाशी ठाणेकरांना ‘पोळीभाजी’ केंद्रांचा आसरा घ्यावा लागला. त्यामुळे पोळीभाजी केंद्राबाहेर तुफान गर्दी उसळल्याने अनेकांना ‘जेवण संपले आहे’ असा फलक वाचून वडापाववर दिवस ढकलावा लागला.

महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ कायद्यातील जाचक अटी-शर्ती व ‘ऍडमिनिस्ट्रेशन पेनल्टी टॅक्स’ प्रणालीला विरोध करून हॉटेल व बार व्यावसायिक मंगळवार दुपारपासून संपावर गेले. या काळात ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, घोडबंदर रोड येथील हॉटेल व बारने हा संप पुकारल्याने मंगळवार रात्रीपासूनच खवय्यांच्या पोटाला या संपामुळे चिमटे बसले. त्यातच आज सकाळी कामावर जाण्यासाठी घरातून उपाशीपोटी निघालेल्या ठाणेकरांना चहा-नाश्त्यासाठी एकही हॉटेल उपलब्ध नव्हते. त्यामुळे गल्लीच्या तोंडावर असलेले चहाचे ठेले, कांदेपोहे, उपमा, शिरा, वडा-भजीचे स्टॉल गर्दीने गजबजले होते.

पोळीभाजी केंद्रासह मॉलमध्ये गर्दी

हॉटेलांचा संप असल्याने खवय्यांनी शहरातील पोळीभाजी केंद्रांकडे मोर्चा वळवला. त्यामुळे दुपारीच तेथील चपाती-भाजीदेखील संपून गेली, तर वडापावच्या गाड्य़ांवरदेखील खवय्ये तुटून पडल्याने त्यांचा धंदाही तेजीत होता. दुसरीकडे मॉलमधील हॉटेल व बार सुरू असल्याने या ठिकाणी तुरळक गर्दी दिसून आली.

ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टॅक्सचे दर कमी

सुरवातीला २५ लाखापर्यंत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पेनल्टी टॅक्स भरण्याच्या नोटीस हॉटेल, बारमालकांना बजावण्यात आल्या होत्या. मात्र केवळ ठाणे पालिकाहद्दीतच अशा पद्धतीने सरसकट वसुली केली जात असल्याचा मुद्दा हॉटेल व्यावसायिकांनी उपस्थित करत संपाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे आता ५०० स्वेअर फुटांपर्यंत – २५ हजार, ५०० ते दोन हजारांपर्यंत – एक लाख, दोन हजार ते पाच हजारांपर्यंत क्षेत्रफळ असलेल्या हॉटेलांना दोन लाख आणि पाच हजार स्वेअर फुटांच्या पुढील बांधकामासाठी पाच लाख असे दर ठरवण्यात आले आहेत.

अखेर सायंकाळी संप मागे…

बुधवारी दुपारी आयुक्त संजीक जयस्वाल आणि हॉटेल, बार असोसिएशनच्या शिष्ठ मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला अग्निशमन दल, आस्थापना आणि शहर विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तब्बल दीड तास चाललेल्या या बैठकीनंतर आयुक्तांनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पेनल्टी टॅक्स कमी करण्याचे आश्वासन हॉटेल व्यावसायिकांना दिले. तसेच ज्या हॉटेल बारला आतापर्यंत सील ठोकण्यात आले होते. त्यांचे सील काढण्याचे आदेशही देण्यात आल्याचे हॉटेल – बार असोशिएशनच्या रत्नाकर शेट्टी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आयुक्तांच्या शिष्टाईनंतर सायंकाळपासून हॉटेल – बारने शटर उघडल्याने ठाणेकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.