शिरूरमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल

2

सामना प्रतिनिधी । शिरूर

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कवठे येमाई येथे सुरु असलेल्या ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर व वडनेर खुर्द येथे बेकायदा दारू धंद्यांवर रविवारी सायंकाळी शिरूर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेतले असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांनी दिली.

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील विविध गावात सुरु असलेल्या अवैध धंद्याबाबत पोलिसांकडे तक्रारी आल्याने ही कारवाई करण्यात आली. यात कवठे येमाई येथे ऑनलाईन फन टार्गेट गेम नावाचा जुगार भागीदारीत चालविणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार खेळण्याचे सुमारे 7,220 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. वडनेर खुर्द येथे बेकायदा गावठी दारू विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकूण तीन जणांविरोधात शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भागात सुरु असणाऱ्या अवैध धंद्यांवर धडक कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.