वाळुची तस्करी करणाऱ्या २१ वाहनांवर कारवाई

1

सामना प्रतिनिधी । पालम

पालम तालुक्यात रहाटी ते भारस्वडा रस्त्यावर रहाटी फाट्यानजीक अवैध रेतीची वाहतूक करणारी २१ वाहने जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी १० मे रोजी रात्री ११ वाजता धाड टाकून पकडली. यातील ४ हायवा पालम पोलीस ठाण्यामध्ये तर १७ वाहने नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलीत आहेत. असे एकूण २१ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे वाळूमाफीयांचे धाबे दणाणले आहेत.

रहाटी परिसरात अवैधरित्या अजूनही अनेक वाळू तस्करांनी मोठ मोठे साठे करून ठेवले आहेत. पी. शिवाशंकर यांच्या अनधिकृत वाळू प्रतिबंधक पथकाची गस्त सुरू असताना रात्री ११च्या सुमारास वाळू वाहतुक करतांना ही वाहने दिसली.

पालम पोलीसांनी प्रत्येकी ५ ब्रास रेतीसह वाहने जप्त केली आहेत. या वाहनाचे चालक बालाजी माधव सूर्यवंशी, सूर्यकांत रमाकांत मोरे दोघेही (रा. बर्दापूर ता. अंबाजोगाई), चंद्रकांत बोधराज गोडबोले (रा. वाजेगाव ता.जि. नांदेड), वसंत त्र्यंबक कराळे (रा. पारवा ता. पालम) यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र पोलिसांना देण्यात आले आहे. तर याच नजीक भारस्वाडा ते अंतेश्वर (ता. लोहा) या शिवेवरून रहाटीकडे जाणाऱ्या वाहनाला पकडून ९ हायवा, १ पिकअप, ६ दुचाकी व टाटा कंपनीची एक जेसीबी जप्त करून सोनखेड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. या कारवाईत पालमचे तहसीलदार श्रीरंग कदम, मंडळाधिकारी विजय बोधले यांचा समावेश आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी येत होत्या. या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने ही कारवाई केली आहे.