चोरीचा मुद्देमाल विकायला आले, पोलिसांच्या जाळ्यात सापडले

1

सामना प्रतिनिधी । मुंबई

दिवसा, रात्री जेव्हा संधी मिळेल तेव्हा बंद घरात घुसून लुटमार करणाऱया चोराच्या गुन्हे शाखेच्या युनिट-9ने मुसक्या आवळल्या आहेत. लाखो रुपयांचा चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी तो साथीदारांसह वांद्रय़ात आला असता पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याच्याकडून लाखो रुपयांचे दागिने, रोकड, परदेशी चलन, मोबाईल आदी मुद्देमाल सापडला आहे.

मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संधी मिळेल तेव्हा घरफोडी करणारे दोघे सराईत चोर चोरीचा ऐवज विकण्यासाठी वांद्रे पश्चिमेकडील कुरेशी नगर परिसरात येणार असल्याची माहिती युनिटचे अंमलदार वारंगे व राऊत यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आशा कोरके, इरफान शेख, शरद धराडे, वाल्मीक कोरे यांच्यासह पथकाने त्या परिसरात सापळा रचला. त्यानुसार मंगळवारी कासिफ हुसेन माहिमी (17) आणि आसिफ अकबर खान (23) ही दुकली कारने कुरेशी नगरात येताच पथकाने त्यांच्यावर झडप घातली. कारमध्ये पोलिसांना 21 लाख किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, अमेरिकन डॉलर्स, टीव्ही, कुलर्स, मोबाईल फोन्स आदी साहित्य मिळाले. त्यामुळे दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी वांद्रे, निर्मलनगर, पायधुनी, माहीम तसेच वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडय़ा केल्याची कबुली दिली. तसेच दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेलेल्या नागरिकांची बंद घरे त्यांच्या टार्गेटवर होती. त्यांनी अनेक घरांची रेकी केली होती पण त्याआधी पोलिसांनी त्यांचा खेळ खल्लास केला.