लोकलमध्ये तरुणीसमोर हस्तमैथून करणाऱ्याला अटक

सामना ऑनलाईन । मुंबई

सीएसएमटीहून पनवेलला जाणाऱ्या लोकलमध्ये तरुणीसमोर हस्तमैथून करणाऱ्या एका तरुणाला छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक पोलिसांनी अटक केली आहे. इम्रान शेख असे त्या तरुणाचे नाव असून तो १९ वर्षांचा आहे. या प्रकरणात महिलेने पोलिसांत तक्रार केली नसल्याने इम्रानवर फक्त सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी इम्रानला तात्काळ न्यायालयतात हजर केले असून न्यायालयाने त्याला दोषी ठरवत फक्त दहा दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

शुक्रवारी दुपारी २.४५ च्या सुमारास सीएसएमटीहून पनवेलला जाणाऱ्या लोकलच्या महिला फर्स्ट क्लासमध्ये फक्त एकच महिला प्रवास करत होती. त्यावेळी अचानक त्या महिलेच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे बाजूच्या डब्ब्यातील पुरुष प्रवासी काय झाले ते बघण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी इम्रान हा त्या महिलेच्या बाजूला उभा होता व त्याचे काहीतरी अश्लिल चाळे सुरू असल्याचे प्रवाशांना दिसले. पुरुष प्रवाशांपैकी एक असलेल्या जितेश उतेकर यांनी इम्रानला पकडण्यासाठी दरवाजाकडे धाव घेतली. त्यावेळी इम्राानही दरवाजावर आला. पुढच्या स्थानकात इम्रान पळून जाईल अशी शक्यता जितेश यांना वाटली म्हणून प्रसंगावधान राखत त्यांनी इम्रानचे फोटो काढले. तोपर्यंत लोकल मश्जिद स्थानकात पोहोचली होती.

दरम्यान, इम्रान धावत्या लोकलमधून उतरून पसार झाला. जितेश यांनी त्या तरुणीला पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले. मात्र तो प्रकार पाहून तिला प्रचंड धक्का बसला होता. ती रडत होती. मग जितेश यांनीच 1512 या क्रमांकावर रेल्वे पोलिसांना घटना कळवून मदत पाठविण्यास सांगितले. मात्र वडाळा स्थानक आले तरी मदत आली नाही. अखेर त्यांनी वडाळा पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याला सीएसएमटीला जाऊन तक्रार नोंदविण्यास सांगितले.

तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी सीएसएमटी व मश्जिद रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच उतेकर यांनी दिलेल्या आरोपीच्या छायाचित्रावरून इम्रान शेख याला अटक केली. इम्रान हा नोकरीधंद्याला नसून तो उदरनिर्वाहासाठी वेगवेगळी काम करतो, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावढणकर यांनी दिली.