पीककर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला अटक

सामना ऑनलाईन । नागपूर

पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करणारा दाताळा येथील सेंट्रल बँकेचा शाखाधिकारी राजेश हिवसे याला अटक करण्यात आली आहे. महिलने दिलेल्या फिर्यादीवरुन बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, तेव्हापासून तो फरार होता. अखेर सोमवारी रात्री मलकापूर पोलिसांनी हिवसे याला नागपुरातून ताब्यात घेतले. उद्या (मंगळवारी) त्याला मलकापूर न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मलकापूर तालुक्यात उमाळी येथील शेतकरी गुरुवारी १४ जून रोजी सकाळी दाताळा येथील सेंट्रल बँकेत त्यांच्याकडे असलेल्या दोन एकर शेतीवर पिककर्ज मागणीसाठी पती-पत्नीसह गेले. सर्व कागदपत्रे जमा करून बँक मॅनेजरला पिककर्ज केव्हा मिळेल याबाबत विचारणा केली. बँक मॅनेजरने मोबाईल नंबर घेत मी कर्ज मंजुरीबाबत मोबाईलवर कळवितो असे सांगितले. मोबाईल नंबर घेतल्यानंतर मॅनेजर राजेश हिवसे याने व त्याला सहकार्य करणार्‍या शिपाई मनोज चव्हाण याने ‘त्या’ शेतकर्‍याच्या पत्नीला मोबाईलवर फोन करून ”तुम्ही माझ्या मलकापूर येथील रुमवर या, तुमच्या हातचा चहा प्यायला खूप आवडेल, तुम्ही खूप सुंदर आहात” असे म्हणून अश्लील संभाषण करीत शरीरसुखाची मागणी केली. तर मनोज चव्हाण यानेही ”साहेब तुम्हाला पॅकेज देतील, तुम्ही साहेबांना खुश करा, साहेब तुम्हाला खुश करतील, मी तुम्हाला साहेबांच्या रुमवर घेऊन जातो” असे म्हणाला.

साहेबांच्या सांगण्यानुसार त्याने या दाम्पत्याचा घरापर्यंत त्यांचा पाठलाग केला. गेल्या आठ दिवसातील या सर्व फोन कॉल्सची रेकॉर्डिंग पीडित महिलेने मोबाईलमध्ये करून ठेवली होती. ती सर्व रेकॉर्डिंग ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक गावंडे यांना देऊन सदर बँक मॅनेजर व शिपायाची तक्रार दिली. या फिर्यादीवरून सेंट्रल बँकेचे मॅनेजर राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्हाण या दोघांविरुद्ध कलम ३५४ (अ) (११) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमानुसार काल गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला होता.