बौद्ध धर्मगुरूला अटक, 15 अल्पवयीन शिष्यांवर केला लैंगिक अत्याचार

3
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । पाटणा

बिहारच्या बोधगया येथे बौद्ध धर्मगुरूने 15 अल्पवयीन शिष्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या धर्मगुरूला अटक केली आहे. ही सर्व मुलं गेल्या एक वर्षापासून या मठात शिक्षण घेत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांना पीडित मुलांच्या शरीरावर मारहाणीच्या खुना आढळून आल्या आहेत.

बोधगया बौद्ध चिंतन केंद्रामध्ये (मठ) शिक्षण घेणाऱ्या आसामी वंशाच्या 15 अल्पवयीन मुलांचे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप बौद्ध धर्मगुरूवर करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी या मठाचा प्रमुख भंते संघ प्रिय सुजोय याला बुधवारी रात्री बेड्या ठोकल्या आहेत. मठातील अल्पवयीन मुलांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती बोधगयाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक राजीव कुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. पोलिसांनी आरोपीला मुस्तीपूर गावातून अटक केली. तसेच पोलीस सध्या बौद्ध स्कूल प्रसन्न ज्योति बौद्ध प्रारंभिक विद्यालय आणि ध्यान केंद्र चालवणारी एनजीओ प्रसन्न सोशल वेलफेअर ट्रस्टबाबत माहिती मिळवत आहेत. तपासात फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यास ट्रस्टच्या सर्व सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असेही पोलिसांनी म्हटले आहे.

मठात नक्की काय व्हायचं?
मठामध्ये नक्की काय व्हायचं याबाबत पीडित मुलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बौद्ध धर्मगुरू संघ प्रिय सुजोय आम्हाला बेडरूममध्ये बोलवायचा आणि लैंगिक अत्याचार करायचा. तसेच याला विरोध केल्यास आरोपी मारहाणही करायचा. मुलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात कारवाई केली आहे.