आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यास पोलिसांनी पकडले

सामना ऑनलाईन , वैजापूर

बाजारातून मोबाईल चोरी करून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यास पोलिसांनी पाठलाग करून अवघ्या काही तासांत जेरबंद केल्याची घटना सोमवारी  घडली. पोलिसांनी नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राहुल पुंडलिक भोसलेला अटक केली असून, त्याच्या ताब्यातून चोरी गेलेला मोबाईल जप्त केला आहे.

शिवाजी सुखदेव तुपे (रा. पानवी खंडाळा) हे आठवडी बाजारात भाजीपाला घेत असताना दुपारी दीड वाजेला त्यांच्या खिशातील ८ हजार रुपयांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला होता. बाजारातून गावातील दुकानात गेल्यावर त्यांना मोबाईल चोरी झाल्याचे समजले. त्यावेळी त्यांनी आपल्या मोबाईलवर संपर्व साधला. मात्र, मोबाईल स्वीच ऑफ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, बाजारात मोबाईल चोरी करणारे संशयित आले असल्याची खबर  पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी बाजारात धाव घेतली. त्यावेळी संशयास्पद हालचाली करणायाला ताब्यात घेत असतानाच त्याने पोलिसांची चाहुल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक बंद असलेला मोबाईल संच आढळून आला. पोलिसांनी तो सुरू केल्यावर लगेचच त्यावर तुपे यांचा फोन आल्याने हा मोबाईल चोरीचा असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्याला हिसका दाखविताच त्याने मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी शिवाजी तुपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या मोबाईल चोरीप्रकरणी पोलिसांनी राहुल भोसले याला अटक केली आहे.

विष पिऊन विवाहितेची आत्महत्या

विषारी औषध सेवन करून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. द्वारकाबाई शिवनाथ गायके (४५, रा. खामगाव, ता कन्नड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. द्वारकाबाई यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन केले. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची वैजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे..