पोलीस झाले सोशल

आशीष बनसोडे
सोशल मीडियाची सध्या जबरदस्त क्रेझ आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाशिवाय कोणाचे पानदेखील हलत नाही. आपले सुख-दुख, संताप, प्रतिक्रिया,आपल्या भावना व्यक्त करण्याचे हे प्रभावी माध्यम. इतकेच नाही तर तक्रार, समस्या मांडण्यासाठीदेखील हा मीडिया सर्वोत्तम प्लॅटफॉर्म बनला आहे. म्हणूनच पोलिसांनीदेखील या मिडियाची दखल घेतली आहे. या ‘मीडिया’चा मार्ग अवलंबत पोलीसही अधिक ‘सोशल’ झाले आहेत.

तक्रार, समस्या आणि फोटो ट्विट
पोलिसांच्या ट्विटर हॅन्डल सर्वांनाच चांगलेच उपयोगी ठरू लागले आहे. आता ट्विटरच्या माध्यमातून कुठूनही थेट पोलिसांशी संपर्क साधता येऊ लागला आहे. कुठेही कोणी काही चूक करीत असेल, कायदा मोडत असेल, लाच मागत असेल, महिलांची छेडछाड काढत असेल, हे आणि असे कुठलेही प्रकार घडत असतील तर ते आता क्षणात पोलिसांच्या ट्विटर हॅन्डलवर ट्विट केले जाते. विशेष म्हणजे ज्या विरोधात तक्रार द्यायची आहे त्याचा फोटोदेखील ट्विट केला जातो. यामुळे झाले असे की, जे कुठल्याही समस्या, तक्रारी करायला, पोलिसांना सांगायला घाबरत होते त्यांना एकप्रकारे बळ मिळाले आहे. मुख्य म्हणजे महिला, तरुणींसाठी तर पोलिसांचे ट्विटर फारच उपयोगी ठरू लागले आहे. ट्विट केल्यानंतर पोलिसांकडून तातडीने मदतदेखील मिळते. मी रिक्षाने प्रवास करतेय आणि दोन तरुण स्कूटीवरून माझा पाठलाग करताहेत, तसेच अश्लील कमेण्ट देत आहेत अशी तक्रार व त्या रोमियांचा फोटोदेखील काढून पोस्ट केला. यामुळे तिला पोलिसांकडून लगेच मदत मिळाली व ते रोडरोमियो गजाआड झाले. अशाप्रकारे ट्विटरवर येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची पोलिसांकडून तत्काळ दखल घेऊन मदत पुरवली जाते.

व्हॉटसअॅपवर मदतीची हाक
व्हॉटसअपचा वाढता वापर लक्षात घेऊन पोलिसांनी नागरिकांसाठी व्हॉटसऍप अकाऊंटदेखील सुरू केले आहे. रेल्वे, जिल्हा तसेच आयुक्तालय पातळीवर व्हॉटसऍप अकाऊंट उघडण्यात आले आहेत. प्रवासादरम्यान काही घडले किंवा कसली मदत हवी असल्यास प्रवासी रेल्वे पोलिसांच्या व्हॉटसऍपवर संपर्क साधतो. लोकलमध्ये जुगार खेळत आहेत, लहान मूल हरवले आहे, दरवाजावर स्टंटबाजी सुरू आहे असे अनेक तक्रारी, समस्या पोलिसांना व्हॉटसऍप केल्या जातात. पोलीसही त्याची गंभीर दखल घेत कारवाई करतात.

फेसबुक पोस्टची गंभीर दखल
पोलीस फेसबुकवरदेखील नजर ठेवून असतात. अनेक जण फेसबुकवर एखादी समस्या, अनुचित प्रकारांचे फोटो पोस्ट करतात. गेल्या महिनाभरात अशा अनेक घटना घडल्या. विशेषकरून रेल्वे पोलिसांच्या हद्दीत विविध रेल्वे स्थानकांमध्ये लिंगपिसाट तरुणांनी तरुणींशी अश्लिल प्रकार केले. हे घडलेले प्रकार त्या तरुणींनी मोबाईलमध्ये कॅमेराबद्ध केले होते. परंतु पोलिसांकडे न जाता त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून त्याविरोधात आवाज उठवला. आपल्यासोबत जे घडले त्याची सविस्तर पोस्ट करून आरोपींचा फोटोदेखील त्यांनी अपलोड केला. पोलिसांनी या पोस्टची गंभीर दखल घेत त्या आंबटशौकीन तरुणांना बेडय़ा ठोकल्या. त्या तरुणींनी रीतसर तक्रार दिलेली नसतानाही पोलिसांनी केवळ फेसबुकवरील पोस्टवरून त्यांना न्याय मिळवून दिला.

हेच पोलिसांनी हेरले
सुरुवातीला सोशल मीडियाचा वापर केवळ चॅटिंग किंवा फोटो शेअर करण्यापुरता केला जात होता. पण नंतर या मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या जाऊ लागल्या. आपल्या तक्रारी, समस्या सर्वांसमोर मांडण्यास सुरुवात केली. कुठेही काही घडत असेल तर त्याचे छायाचित्र, व्हिडीओ काढून ते वायरल केले जाऊ लागले. अगदी झटपट सर्वांपर्यत चांगले तसेच वाईट प्रकार पोहचू लागले. त्यामुळे पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. नागरिकांच्या मदतीसाठी पोलीसही सोशल मीडियाच्या मैदानात उतरले आणि त्यांनी व्हॉट्सऍप अकाऊंट तसेच ट्विटर हॅन्डल सुरू केले.

तर क्लिक करा आणि पोस्ट करा
सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गणेशोत्सवात सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहेच. पण नागरिकांनीदेखील जागृत असणे गरजेचे आहे. कुठेही काही संशयास्पद दिसल्यास लगेच आम्हाला कळवा. संशयास्पद वस्तू, इसम असे काही नजरेस पडल्यास फोटो काढून आम्हाला ट्विट करा. अथवा १०० वर कॉल करून तशी माहिती द्या असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

[email protected]