पुरुषी चालीमुळे बुरख्यातला आरोपी सापडला

सामना प्रतिनिधी । मुंबई

ऍण्टॉप हिल पोलिसांनी मंगळवारी वडाळा टीटी येथे राहणाऱया एकाचा जीव वाचवला. योगेश पाटील हा गुन्हेगार त्या इसमाची हत्या करण्याच्या तयारीत होता. कोणाला संशय येऊ नये म्हणून बुरखा घालून योगेश पिस्तूल आणि काडतुसे घेऊन चालला होता. पण त्याची पुरुषी चाल पोलिसांनी हेरली आणि तो पकडला गेला.

अनंत चतुर्दशीनिमित्त ऍण्टॉप हिल पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी साडेसातच्या सुमारास युनिट-४ जंक्शन येथे असलेल्या शाळेजवळ योगेशने एका अज्ञात इसमाकडून पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे घेतली. ते घेतल्यानंतर योगेश वडाळा टीटीच्या दिशेने पायी निघाला. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने वेषांतर केले आणि बुरखा घालून चालू लागला. पण एका नागरिकाची योगेशवर नजर गेली आणि तेथे तैनात असलेले कॉन्स्टेबल देवीदास बडेकर यांना त्याने तसे सांगितले. त्यामुळे बडेकर यांनी योगेशचा पाठलाग केला असता त्यांना बुरख्यातल्या व्यक्तीची चाल पुरुषी वाटली. त्यांनी लगेच ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रियदर्शन पैठणकर व पोलीस निरीक्षक संजय भापकर यांना सांगितले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार बडेकर यांनी बुरखाधारी व्यक्तीचा पाठलाग सुरू केला. कोणीतरी पाठलाग करीत असल्याचे कळताच योगेशने पळण्याचा प्रयत्न केला. पण एपीआय सचिन जाधव, उपनिरीक्षक राजगुरू, बडेकर, घडशी यांनी पाठलाग करून योगेशला पिस्तुलासह रंगेहाथ पकडले.

हत्येच्या बदल्यात झोपडी

वडाळा टीटी येथे राहणाऱ्या एकाची हत्या करण्याची सुपारी योगेशला मिळाली होती. त्याच परिसरात राहणाऱया गुन्हेगाराने योगेशला ही सुपारी दिली होती. पण कोणाची हत्या करायची आहे ते सांगितले नव्हते. युनिट-४ जंक्शन येथून हत्यार घेऊन ये मग सांगेन त्याला गोळ्या घाल असे योगेशला सांगण्यात आले होते. काम फत्ते केल्यानंतर सुपारी देणारा गुन्हेगार योगेशला झोपडी देणार होता.