कोकणात जाणाऱ्या मेलगाड्यांमध्ये सोनसाखळीचोरी

1
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

कोकणात जाणाऱया अथवा तेथून मुंबईत येणाऱया मेलगाडय़ांमध्ये महिला प्रवाशांच्या गळय़ातील सोन्याचे दागिने हिसकावून पसार होणारा चक्कनलाल बाबूलाल सोनकर (४०) हा चोरटा रेल्वे क्राइम ब्रँचच्या हाती लागला आहे. त्याने नऊ गुह्यांची कबुली दिली असून पोलिसांनी त्याच्याकडून ५ लाख ८३ हजार किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत.

दिवा ते पनवेल यादरम्यान कोकणात जाणाऱया मेलगाडय़ांमध्ये पहाटे ४ ते ५ च्या सुमारास सोनसाखळी चोरीच्या गुह्यांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे याची गंभीर दखल घेत क्राइम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत रासम, सहाय्यक उपनिरीक्षक अशोक होळकर, अंमलदार शेडगे, पाटील, भांडवले, मीनाक्षी गोहिल, नाईक, भोजणे, वृषाली मयेकर आदींच्या पथकाने दोन पथके तयार करून दिवा ते पनवेलदरम्यान सापळा लावला होता.

चक्कनलाल हा मूळचा यूपीचा आहे. कामानिमित्त जात असल्याचे सांगून तो मुंबई गाठायचा. त्यानंतर ग्रॅण्ट रोड येथील हर्षा लॉजमध्ये प्रतिदिन एक हजार भाडय़ाने दोन-तीन महिने राहायचा. पनवेल-दिवादरम्यान चोऱया केल्यानंतर खेतवाडीत राहणाऱया विंकल शहा यांच्यामार्फत दागिने विकायचा.