पोलिसाला सलाम! जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण

सामना ऑनलाईन । भोपाळ

अपघात झाला की अपघातग्रस्तांना मदतीचा हात न देता आहे त्या परिस्थितीमध्ये टाकून देणारे अनेक पाहिले असतील, परंतु मध्य प्रदेशमध्ये एक पोलीस अपघातग्रस्ताला खांद्यावर उचलून एक किलोमीटर धावला आणि त्याचे प्राण वाचवले. पूनम बिल्लोर असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मध्यप्रदेशमधील होशंगाबग जिल्ह्यातील शिवपूरजवळ शनिवारी एक व्यक्ती चालत्या गाडीतून पडला. यानंतर उपस्थितांनी तात्काळ 100 नंबर डायल करून याची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल पूनम बिल्लोर आणि 100 नंबर गाडी चालक राहुल साकल्ले घटनास्थळी दाखल झाले. रेल्वेमधून पडल्याने तरुण गंभीर जखमी झाला होता, परंतु घटनास्थळी गाडी पोहोचण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. वेळेचे भान राखत पूनमने जखमीला खांद्यावर उचलले आणि जवळपास एक किलोमीटरवर लावलेल्या गाडीपर्यंत धावत गेला. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पूनमच्या या कामगिरीचे पोलीस महासंचालक व्ही.के.सिंह यांनी कौतुक केले आहे.

दरम्यान, जखमी तरुणानचे नाव अजीत असल्याचे समोर आले असून त्याच्यावर भोपाळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलीस महासंचाकल व्ही.के.सिंह यांनी होशंगाबाद पोलीस अधिक्षकांना या शूर जवानाचा पुरस्कार देऊन गौरव करण्याचे निर्देश दिले आहेत.