पोलीस डायरी : नोकऱ्या द्या, नाहीतर भामटय़ांना ‘मोक्का’ लावा!

109

>> प्रभाकर पवार

सर्वाधिक बेरोजगारांचा देश अशी आपल्या देशाची जगामध्ये ओळख आहे. नरेंद्र मोदी यांनी 2014 साली या देशाचे पंतप्रधान म्हणून प्रथमच सूत्रे हाती घेतली तेव्हा सुमारे 14 कोटी बेरोजगार होते. आता मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली तेव्हा तर बेरोजगारीचा आकडा 30 कोटींपर्यंत गेला आहे. जेट एअरलाइन्सच्या 12 हजार कर्मचाऱ्यांना अलीकडे एका क्षणात घरी बसावे लागले आहे. म्हणजे आता आहे त्या नोकऱ्यांचीही शाश्वती राहिलेली नाही. जास्तीत जास्त तरुण-तरुणींचा सरकारी नोकऱ्यांकडे कल असतो; परंतु आता संगणकीकरणामुळे दिवसेंदिवस सरकारी नोकऱ्या कमी होत आहेत. तरीही कुठे जाहिरात प्रसिद्ध झाली तर उमेदवारांची सरकारी नोकऱ्यांसाठी झुंबड उडते. मध्यंतरी रेल्वेने मेगाभरतीची वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली आणि देशभरातून गरजूंच्या उडय़ा पडल्या. लाखो अर्ज रेल्वेच्या कार्यालयात पाठविण्यात आले. याचदरम्यान रेल्वेची एक बनावट वेबसाइट तयार करून भामटय़ांनी आपला गोरखधंदा सुरू केला. रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस, कारकून व तत्सम प्रकारच्या पदांवर रेल्वेत नोकरी मिळवून देण्यासाठी देशभरातून शेकडो बेकार तरुणांकडून करोडो रुपये उकळले गेले. उमेदवारांना रेल्वेचा लोगो असलेली बनावट पत्रे वितरित करून नोकरीवर रुजू होण्यासाठीही काही रेल्वे स्थानकांत पाठविले गेले, परंतु काही महिन्यांतच आपली फसवणूक झाल्याचे उमेदवारांच्या लक्षात आल्यानंतर मुंबईसह देशभरात अलीकडे नोकरीचे आमिष दाखवून फसविल्या गेल्याच्या तक्रारी नोंदविल्या गेल्या.

मुंबईच्या गोरेगाव, आग्रीपाडा, भोईवाडा आदी पोलीस ठाण्यांत नोकरीचे आमिष दाखवून फसविल्या गेल्याच्या असंख्य तक्रारींची नोंद झाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखा युनिट क्र. 11 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव व मुंबई गुन्हे शाखेचे युनिट क्र. 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकुंबे यांच्या पथकाने शहर व ग्रामीण भागात रेल्वेसारख्या शासकीय आस्थापनांमध्ये चांगल्या पदावर नोकरी असल्याचे भासवून गरीब व गरजू तरुणांना लाखो-करोडो रुपयांना फसविणाऱ्या टोळय़ांना नुकतीच अटक केली. त्यावेळी पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती आली आहे. हिंदुस्थानी रेल्वेचा लोगो वापरून या भामटय़ांनी लेटरहेड, व्हिजिटिंग कार्ड, पगाराच्या पावत्या, रेल्वेचे आयकार्ड, हजेरीपटासाठी लागणारे लेजर बुक आदी साहित्याचा उमेदवारांना संशय येऊ नये म्हणून वापर केला गेल्याचे उघड झाले. तिकीट तपासणी कशी करावी याचे प्रशिक्षण अगदी रेल्वे स्थानकावर उभे करून दिले गेले होते. त्यामुळे नोकरी मिळाली, अशी खात्री पटलेल्या काही तरुणांनी लाखो रुपये कर्ज काढून, घरातील किमती वस्तू विकून भामटय़ांना पैसे दिले होते; परंतु काही महिन्यांनंतर रेल्वेत नोकरीसाठी लाखो रुपये मोजणाऱ्या तरुणांना शंका आली आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असता रेल्वेत नोकरी देतो असे भासवून फसविणाऱ्या देशभरातील बऱ्याच टोळय़ांचा पर्दाफाश झाला. मुंबई क्राइम ब्रँचचे चिमाजी आढाव, संजय निकुंबे आदी अधिकारी व त्यांचे सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. नोकरीचे आमिष दाखवून गरीब व गरजू तरुणांना फसविणाऱ्या टोळय़ांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परीक्षेला डमी उमेदवार बसवून इच्छुक उमेदवाराला उत्तीर्ण केले जात आहे आणि त्यांच्याकडून 25 लाख रुपयांपेक्षाही अधिक रक्कम उकळली जात आहे. परंतु अलीकडे डमी उमेदवाराला परीक्षेला बसवून एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरीत रुजू झालेल्या एका तरुणाला ‘टायपिंग’ येत नसल्याने त्याचा भंडाफोड झाला आणि डमी उमेदवारासह त्या तरुणाला जेलमध्ये जावे लागले. माटुंगा पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

सरकारी नोकरीचे आजही 80 टक्क्यांपेक्षा जास्त तरुण-तरुणींना आकर्षण आहे. सरकारी नोकरी मिळाल्यावर बहुसंख्य तरुण स्वतःला धन्य समजतात. त्याचाच फायदा भामटे घेत आहेत. आपल्या मिठास वाणीने बेरोजगार तरुणांना आपले करून घेतात. खोटी व्हिजिटिंग कार्डे, लेटरहेडचा वापर करून आपण कुणी बडा अधिकारी अथवा कुणातरी मंत्र्याचा, राजकीय  पुढाऱ्याचा जवळचा माणूस असल्याचे भासवतात आणि तरुणांची फसवणूक करतात. हे आज वर्षानुवर्षे सुरू आहे. आज तरी पैसे देऊन नोकरी मिळत नाही. तो जुना काळ संपला. आता बनवेगिरीशिवाय काही नाही हे आजच्या तरुणांनी लक्षात घ्यावे. पैसे देऊन ज्याला नोकरी मिळाली असेल असा भाग्यवान सापडणेच कठीण. तरीही लोक विश्वास ठेवतात आणि खड्डय़ात जातात. एकतर सरकारी नोकऱ्याच शिल्लक नाहीत.

आज बेरोजगारी झपाटय़ाने वाढत आहे. घरात कुणी कमवता नसतो. अशा वेळी भामटे त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांना (नोकरीच्या आमिषाने) किडूकमिडूक विकायला लावून आयुष्यातून उठवतात. तेव्हा नोकरीचे आमिष दाखवून फसविणाऱ्यांविरुद्ध आता ‘मोक्का’सारखी कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. हा फारच गंभीर प्रश्न आहे. अमेरिका, कॅनडासारख्या देशात नोकरी देतो अशी वेबसाइटवर बनवेगिरी करणाऱ्यांनीही देशभरात धुडगूस घातला आहे. संगणकीकरण वरदान की शाप, असा आता प्रश्न पडू लागला आहे. आज बनावट वेबसाइट उघडून जितके फसविले जात आहे तितके कुठे नाही. वाढती बेरोजगारी ही आज प्रत्येक देशासाठी एक गंभीर समस्या होऊन बसली आहे. त्याचाच फायदा आज लफंगे घेत आहेत. हिंदुस्थानमध्ये तर भयावह परिस्थिती आहे. हिंदुस्थानातील बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड व उत्तर प्रदेशातील पहाडी भागात प्रचंड बेकारी आहे. त्यामुळे याच प्रदेशातील गुन्हेगार ऑनलाइन फ्रॉडमध्ये मोठय़ा प्रमाणावर आहेत. मुंबई पोलिसांचा नेहमी याच भागात दौरा असतो (आरोपींचा शोध घेण्यासाठी.) आपली ‘बँक’ खाती याच भागातील गुन्हेगार अधिक साफ करीत असतात. तेव्हा सत्तेवर आलेल्यांनी बेरोजगारांना वेळीच जर रोजगार मिळवून दिला नाही तर उद्या कुणी सुरक्षित राहणार नाही हे लक्षात ठेवा. साऱ्या देशातील गुन्हेगारांचा मुंबईवर डोळा आहे. त्यामुळेच एटीएम व बँक फ्रॉड वाढले आहेत. नोकरीचे आमिष दाखविणाऱ्या भामटय़ांचा सुळसुळाट वाढला आहे. महिलांना अंगावर दागिने घालून रस्त्यातून फिरणे मुश्कील झाले आहे. घर बंद ठेवणेही धोक्याचे झाले आहे. बेरोजगारीचा भस्मासुर वाढल्यामुळेच आज मोठय़ा प्रमाणात लुटमार सुरू आहे. राज्यकर्त्यांनी गुन्हेगारी जर आटोक्यात आणायची असेल तर बेरोजगारीचा प्रश्न सोडवला पाहिजे, गुन्हेगारांवर ‘मोक्का’सारखी कठोर कारवाई केली पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या