पोलीस डायरी- कशासाठी… क्रूरकर्मा मुन्ना झिंगाडासाठी!

13

>> प्रभाकर पवार

पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या अझर मसूद यास चीन अजूनही आंतरराष्ट्रीय दहशतवादी मानण्यास तयार नाही. कसा मानेल! अझर मसूदसारख्या अतिरेक्यांना शस्त्रपुरवठा व अर्थसहाय्य करून हिंदुस्थानसारख्या प्रतिस्पर्धी देशामध्ये घातपाती कारवाया करून देश खिळखिळा करता येतो, जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करता येते. अझर मसूदवर जर कारवाई झाली तर हे सारे बंद होईल व हिंदुस्थानचा झपाटय़ाने विकास होऊन जगात हिंदुस्थान एक बलाढय़ शक्ती म्हणून उभी राहील. चीनला हे सारे नको आहे. चीनला हिंदुस्थानात सतत अशांतता हवी आहे. हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करून चीनला या देशाची पुन्हा फाळणी करावयाची आहे. त्यामुळे चीन हा पाकिस्तानातील मसूदला पाठिंबा देत असून चीनने जर शहाणपणा दाखविला नाही तर भविष्यात तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सध्या चीनला कश्मीरसह साऱया हिंदुस्थानात हिंदू-मुस्लिम द्वेष निर्माण करण्यासाठी मसूद अझरची गरज आहे, तर पाकिस्तानला बँकॉक येथे छोटा राजनवर प्राणघातक हल्ला करणारा व सध्या बँकॉक पोलिसांच्या ताब्यात असलेला मुंबईचा गुंड मुन्ना झिंगाडा हवा आहे. मुंबईत अशांतता निर्माण करण्यासाठी.

आयएसआयने दाऊद व टायगर मेमनच्या मदतीने मुंबईत 1993 साली 12 महासंहारक बॉम्बस्फोट घडवून आणल्यानंतर सुनील सावंत ऊर्फ सावत्या, अनिल परब आदी हिंदू गुंड वगळता छोटा राजन, सुभाष सिंग ठाकूर, भाई ठाकूर आदी बहुसंख्य हिंदू गुंड दाऊद टोळीतून फुटले. छोटा राजनने आपली स्वतंत्र टोळी स्थापन करून त्याने हिंदूंची सहानुभूती मिळविण्यासाठी 1993 सालातील बॉम्बस्फोट मालिकेत भाग घेणाऱया व जामिनावर सुटलेल्या आरोपींना टार्गेट केले. जो दिसेल त्या बॉम्बस्फोट आरोपींना छोटा राजनच्या इशाऱयावरून (दहा वर्षांपूर्वी) गोळय़ा घालून ठार मारण्यात येत होते. त्यामुळे दाऊद टोळीत अस्वस्थता पसरली. छोटा राजन हा एक अंडरवर्ल्ड डॉन म्हणून उदयाला आला. त्यामुळे त्याला रोखणे आवश्यक होते. दाऊदने ही जबाबदारी छोटा शकीलवर सोपविली. छोटा शकीलने छोटा राजनचे काही हस्तक फोडले. चेंबूरचा हॉटेल मालक विनोद शेट्टी हा छोटा राजनच्या संपर्कात होता. त्याला फोडून छोटा शकीलने छोटा राजनच्या बँकॉक येथील वास्तव्याची खबर मिळविली आणि 15 सप्टेंबर 2000 चा तो दिवस उजाडला.

छोटा राजन हा आपला अत्यंत विश्वासू साथीदार रोहित वर्मा याच्यासोबत बँकॉक येथील घरी गप्पा मारत असतानाच 15 सप्टेंबर रोजी दरवाजाची बेल वाजली. रोहितने दरवाजा उघडला असता स्टेनगनधारी हल्लेखोरांनी त्याच्यावर व छोटा राजनवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात मुंबईच्या सांताक्रुझचा रोहित वर्मा हा तरुण जागीच ठार झाला, तर छोटा राजन पोटात गोळी गेल्याने गंभीर जखमी झाला. परंतु त्याही स्थितीत छोटा राजनने खिडकीतून उडी मारून पलायन केले तर छोटा राजनवर हल्ला करणारा मुंबईच्या जोगेश्वरीचा मुन्ना झिंगाडा सुरक्षारक्षकाकडून पकडला गेला. तेव्हापासून आज दोन दशके उलटत आली आहेत तरी बँकॉक पोलिसांनी अनेक गंभीर गुह्यांत वॉण्टेड असलेल्या खतरनाक मुन्ना झिंगाडा यास मुंबई पोलिसांनी मागणी करूनही अद्याप ताब्यात दिलेले नाही. पाकिस्तान म्हणते, मुन्ना झिंगाडा हा आमचा नागरिक आहे. त्याचा जन्म पाकिस्तानात झाला असा दावा करून पाकिस्तानने बँकॉकच्या न्यायालयात खोटे कागदपत्र सादर केले आहेत. वास्तविक मुन्ना झिंगाडाशी पाकिस्तानचे काहीही देणेघेणे नाही. मुन्ना झिंगाडा हा मुंबईत लहानाचा मोठा झाला याचे पुरावे मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकाऱयांनी बँकॉक न्यायालयात अलीकडे सादर करून पाकिस्तानची बोलती बंद केली. बँकॉक न्यायालयाने हिंदुस्थानच्या बाजूने निकाल दिला तरीही पाकिस्तानने बँकॉक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. यावरून पाकिस्तानला हिंदुस्थानातील गद्दारांची, संघटित गुंडांची किती गरज आहे हे दिसून येते.

मुन्ना झिंगाडा यास जर बँकॉक न्यायालयाने पाकिस्तानची बाजू ऐकून त्यांच्या ताब्यात दिले तर मुन्ना झिंगाडा यास पाकिस्तान आपल्याविरुद्ध दाऊद, छोटा शकीलप्रमाणे वापरणार आहे. आज मुंबईतील 200च्या वर संघटित गुंड पाकिस्तानात आहेत. त्याचा वापर पाकिस्तान आपल्याविरुद्ध सतत करीत असते हे लपून राहिलेले नाही. परंतु जे हिंदुस्थानी गुंड आहेत, अतिरेकी आहेत त्यांनाही आपल्याच देशाचे नागरिक असल्याचा कांगावा पाकिस्तान करते याला काय म्हणावे? तेव्हा पाकिस्तानबरोबर ‘समझोता’ करणे म्हणजे आत्मघात करण्यासारखे आहे. पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या नसानसात खोटारडेपणा भरलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा भविष्यात विकास होईल असे वाटत नाही. मुंबईच्या जोगेश्वरीत वाढलेला हिंदुस्थानी गुंड आपणास वापरण्यास मिळावा म्हणून पाकिस्तानची चाललेली धडपड केविलवाणी आहे. मुन्ना झिंगाडा हा अत्यंत खतरनाक गुंड आहे. मुंबईतील 1992-93 च्या हिंदू-मुस्लिम दंगलीत त्याचा सक्रिय सहभाग होता. जोगेश्वरीची राधाबाई चाळ याच नराधमाच्या पुढाकाराने पेटविली गेली, मराठी कुटुंबीयांना जिवंत जाळले. त्यानंतर मुंबईत जातीय दंगलीचा आगडोंब उसळला. अशा या गुंडास वास्तविक फासावर चढविले पाहिजे. परंतु पाकिस्तानला अशा क्रूरकर्म्याची गरज आहे. यावरून पाकिस्तान किती कपटी व मानवतेच्या विरुद्ध आहे ते पहा! मुन्ना झिंगाडा हा हिंदुस्थानात जन्मलेला आहे. तरीही तो आमचा नागरिक आहे. आमच्या तो ताब्यात द्या, अशी बेशरमपणाची मागणी पाकिस्तान करते, खोटेपणाचा हा कळस झाला. मुंबईवर हल्ला करणारे हाफीज सईद, अझर मसूद, दाऊद, टायगर मेमन, छोटा शकील आदी गुंड राहिले बाजूला आता मुन्ना झिंगाडाही देणार नाही असे पाकिस्तान ठामपणे सांगते. यावरून पाकिस्तान आपल्याच देशाचा नरक व अतिरेक्यांचा अड्डा बनवू पाहत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या