आठ तास ड्युटीचा नवा प्रयोग, ‘बाळ’ वाढत आहे, पण…

प्रभाकर पवार । मुंबई

स्वातंत्र्यानंतरचे मुंबईचे ३९ वे पोलीस आयुक्त म्हणून दत्ता पडसलगीकर यांनी २०१६ साली सूत्रे हाती घेतली. त्यास जानेवारी महिन्यात दोन वर्षे पूर्ण झाली. येत्या ३१ ऑगस्ट रोजी ते वयाच्या साठाव्या वर्षी रिटायर्ड होत असून त्यांच्या चांगल्या कामाचा मोबदला म्हणून आणखी सहा महिने त्यांना मुदतवाढ मिळू शकते. त्यामुळे पडसलगीकर या वर्षअखेरीस सेवानिवृत्त होणार एवढे नक्की. दत्ता पडसलगीकर हे महाराष्ट्र पोलीस दलातील एक नॉन कॉण्ट्रिव्हर्सल व प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्याविषयी कुणी वाईट बोलणारा आपणास चुकूनही सापडणार नाही. आपल्या हाताखालील साध्या शिपायाशीही पडसलगीकर अगदी अदबीने बोलतात. बोलताना, सांगताना त्यांच्या स्वरात विनंतीच अधिक असते. अशा अधिकाऱ्याने जेव्हा मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतली तेव्हाच त्या अधिकाऱ्याने रोज दिवसरात्र, वेळेचे भान न ठेवता किमान १२ ते १४ तास काम करणाऱ्या पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याचा ध्यास घेतला आणि त्यात त्यांना अलीकडे यश आले आहे. मुंबई पोलीस शहरात ९४ पोलीस ठाणी असून प्रत्येक पोलीस ठाण्यात शिपायासाठी आठ तासांची ड्युटी लागू करण्याच्या सूचना प्रत्येक पोलीस ठाण्याला त्यांनी दिल्या आहेत. पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, फौजदार आदी अधिकाऱ्यांनाही आठ तासांच्या ड्युटीचा लाभ लवकरच मिळणार आहे. मुंबईतील पोलीस ठाण्यांतील शंभर टक्के पोलिसांना आठ तासांची ड्युटी मिळाल्यानंतर ते तणावमुक्त होतील असे सांगण्यात येते. सततच्या बंदोबस्त व तपासामुळे पोलिसांना आपल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता येत नाही. त्यांना त्यांच्यासोबत राहता येत नाही. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देता येत नाही. कुठे समारंभांनाही जाता येत नाही. घरचा कर्ता घरात वेळेवर येत नसल्यामुळे साऱ्या कुटुंबाचा कोंडमारा होतो म्हणून पडसलगीकर यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलिसांच्या कामाचे तास कमी व्हावेत म्हणून प्रथम गोवंडी पोलीस ठाण्यात पोलीस शिपायांच्या आठ तास ड्युटीचा प्रयोग सुरू केला. त्यात त्यांना यश आल्यानंतर आठ तास ड्युटीचा फंडा त्यांनी मुंबईतील ९४ पोलीस ठाण्यांत सुरू केला असून पोलीस आयुक्तांनी जन्माला घातलेले हे आठ तास ड्युटीचे नवे बाळ चांगलेच बाळसे धरत आहे. सारे पोलीस शिपाई व त्यांचे कुटुंबीय खूश झाले आहेत. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना लाख लाख धन्यवाद देत आहेत.’

पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याचा यापूर्वीही बऱ्याच अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला होता, परंतु त्यात त्यांना यश आले नव्हते. परंतु पडसलगीकर हे भावनाप्रधान असून व पोलीस शिपायांविषयी त्यांना कळकळ, तळमळ असल्याने पोलीस शिपायांच्या आठ तास डय़ुटीचा प्रश्न त्यांनी लावून धरला. त्याचा पाठपुरावा केला. पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची इच्छा नसतानाही त्यांनी आपल्या हाताखालील शिपायांना न्याय देण्यास भाग पाडले. त्यामुळे उद्या पडसलगीकर रिटायर्ड झाले व नवीन आलेल्या कुणा आयुक्ताने पोलिसांच्या आठ तास ड्युटीचा हा प्रयोग मोडीत काढण्याचा प्रयत्न केला तर तो फसण्याची शक्यताही आहे. कारण तसे केल्यास पोलीस शिपायांकडून मोठा उठाव होण्याची शक्यता आहे. त्यांना आता आपल्या कुटुंबीयांना न्याय द्यायचा आहे. स्टाफ कमी आहे तर नवीन भरती करा, परंतु आता आमचे शोषण करू नका, आम्हाला अहोरात्र राबवू नका. आम्ही वेठबिगार नाही, आम्हीही माणसे आहोत असे ते खुलेआम बोलत आहेत. शासनानेही पोलिसांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करून पोलिसांची कार्यक्षमता वाढवावी. कमी मनुष्यबळामुळे पोलिसांवर आज प्रचंड ताण पडत आहे. कधी कधी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांवर सतत हल्ले का होतात? कारण १२-१२, १४-१४ तास डय़ुटी केल्याने त्यांचे एक्झर्शन झालेले असते. पोलीस पूर्णपणे कोलमडलेला असतो. अशा वेळेला तो गुन्हेगारांशी काय व कसा लढणार? आज पोलीस ठाण्यात येणाऱया खऱ्याखोट्या तक्रारींमुळे पोलिसांचा जीव मेटाकुटीला आलेला असतो. पोलीस ठाण्यात आलेल्या अर्ध्याअधिक विनयभंग व बलात्काराच्या केसेस खोट्या असतात. बनावट कागदपत्रे दाखवून जमिनीचा कब्जा मिळविण्यासाठी पोलिसांना मध्ये टाकतात. त्यामुळे मुंबई पोलीस दल खरोखर नावारूपाला आणायचे असेल, त्यांचा दर्जा सुधारायचा असेल तर मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस भरती सुरू करणे आवश्यक आहे. पोलीस शिपायांच्या आठ तासांच्या नव्या प्रयोगामुळे पोलिसांना आता वाहनचालक, ऑपरेटरही कमी पडणार आहेत. याचाही शासनाने विचार करावा. कारण मुंबईत ‘२६/११’ सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास आपले मुंबई पोलीस कमी मनुष्यबळ, कुचकामी वाहने व शस्त्र यांमुळे शत्रूंशी सामना करू शकणार नाहीत याचाही शासनाने गांभीर्याने विचार करावा आणि मुंबईत सुरू झालेला आठ तास ड्युटीचा नवा प्रयोग राज्यभर राबवावा, या नव्या बाळाला वाढू द्यावे अशी मागणी सारे महाराष्ट्र पोलीस दल करीत आहे.