संभाजीनगरात पोलीस आक्रमक : गोळीबार, कोम्बिंग ऑपरेशन, ५०० जण ताब्यात

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

भीमा कोरेगाव प्रकरणाच्या पडसादामुळे निर्माण झालेल्या तणावामुळे बंदच्या दिवशी आंबेडकरनगरात पोलिसांवर दगडफेक करीत सात वाहनांची तोडफोड केली तर गुरुगोविंदसिगपुरा भागात दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. दगडफेकीत सहायक आयुक्त गोवर्धन कोळेकरसह सात पोलीस कर्मचारी तर सात नागरिकही जखमी झाले. जमाव संतप्त होत असल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार करून अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. हल्ले वाढत असल्याने पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत वस्त्यांमध्ये कोंम्बिंग ऑपरेशन करून तब्बल ५०० जणांना ताब्यात घेतले. बंद यशस्वी करण्यासाठी महिलाही रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडत असल्याने काही ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. तोडफोड करून दंगल घडविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणाच्या पडसादाने शहरात उद्रेकाचे वातावरण आहे. मंगळवारी सकाळपासून जमावाने शहराच्या विविध भागांत मोठ्या व्यवसायिक प्रतिष्ठानांवर, येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर तुफान दगडफेक केली. दगडफेकीत शंभर वाहनांचा चुराडा करण्यात आला. यात पोलिसांच्या ११ वाहनांचा समावेश होता. जमावाला काबूत ठेवण्यासाठी पोलिसांनी ३७ राऊंड हवेत गोळीबार करून जमावाला पांगवले. संतप्त जमावाने गुरुगोविंदसिंगपुरा भागात पोलिसांवर हल्ले केले. यात दोन पोलीस निरीक्षक, १७ पोलीस कर्मचाऱ्यांसह ३० जण जखमी झाले. पोलिसांनी ८ ठिकाणी लाठीमारही केला होता. या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करून पोलिसांनी मध्यरात्रीपासून कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यास सुरुवात केली.

भारिप-बहुजन महासंघाने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. यामुळे आज तिसऱ्या दिवशी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत वस्त्यांमध्ये धरपकड मोहीम राबवली. आंबेडकरनगरात आज सकाळी जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. दगडफेकीत सहायक आयुक्त गोवर्धन कोळेकरसह सीआरपीएफचे तीन उपनिरीक्षक, एक पोलीस निरीक्षक आणि दोन कर्मचारी जखमी झाले. तर पोलिसांची नव्याने दाखल झालेली चार वाहने आणि तीन जुनी अशा सात वाहनांचे नुकसान झाले. तर गुरुगोविंदसिगपुरा भागातही पोलिसांनी दगडफेक करण्यात आली. यात पोलिसांची दंगा नियंत्रक वाहने आणि एक पोलिसांची वाहनाचे नुकसान झाले. मोठ्या संतप्त जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे जमाव बिथरला. त्यानंतर पोलिसांनी एसआरपीची कुमक बोलावून वसाहतीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यास सुरुवात केली. दगडफेक करणाऱ्या आणि चिथावणी देणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यात काही महिलांचाही समावेश आहे. शिवाजीनगर आणि पुंडलिकनगर भागातही जमावाने दुकानावर आणि पोलिसांवर दगडफेक केली. तसेच इस्सार पेट्रोलपंपावर दगडफेक करून तोडफोडही केली. पोलिसांनी शहराच्या विविध वसाहतीत कोम्बिंग ऑपरेशन राबवत ५०० जणांना ताब्यात घेतले. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

शहरात कडकडीत बंद
विविध संघटनांनी पुकारलेल्या बंदला संभाजीनगर शहर आणि परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आज शहर आणि परिसरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, लहानसहान दुकानांसह चहाटपऱ्याही बंद होत्या. सकाळी ९ वाजेपासून शहरातील सर्वच भागांत कडकडीत बंद पाळण्यात आला. भावसिंगपुरा, जयसिंगपुरा, नागसेनवन परिसर, बेगमपुरा, जयभीमनगर, घाटीपासून सिटीचौक, गुलमंडी, टिळकपथ, पैठणगेट ते क्रांतीचौक, समर्थनगर, निरालाबाजार, बसस्थानक परिसर, कोतवालपुरा, गरमपाणी भागांतील व्यापाऱ्यांची प्रतिष्ठाने बंद होती.