कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहंदीचा न्यायालयातून अपहरणाचा प्रयत्न

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

सुपारीबाज किलर इम्रान मेहंदी टोळीला अंतिम सुनावाणीसाठी न्यायालयात नेत असताना पोलिसांवर हल्ला करून अपहरण करण्याचा कट गुन्हे शाखेच्या पथकाने उधळून लावला. नारेगाव चौकात सापळा रचून पोलिसांनी दोन दुचाकीवरील तिघांना तसेच दोन कारमध्ये असलेल्या अपहरणकर्तांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवरच प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी एकूण 11 अपहरणकर्त्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून दोन कारसह दोन दुचाकी, एक पिस्टल, आठ जिवंत काडतुसे आणि 8 मोबाईल असा ऐवज जप्त केला. कट रचणाऱ्या एका आरोपीला न्यायालयाने जन्मठेप तर दुसऱ्या आरोपीला निर्दोष सोडले आहे.

कुख्यात सुपारीबाज किलर इम्रान मेहंदी व त्याच्या टोळीने सहा वर्षांपूर्वी शहरातील सलीम कुरैशी यांच्यासह पाच जणांची निर्घृन हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी इम्रान मेहंदीसह 11 आरोपींना अटक केली होती. यातील तीन आरोपी हे सध्या जामीनावर सुटलेले आहे. जामीनावर सुटलेले खालेद चाऊश आणि मोहंमद शोऐब यांनी मुख्य म्होरक्या मेहंदी याला पळवून नेण्याचा कट रचला. शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेला सरुफ खान व त्याचा साथीदारांच्या मदतीने आज सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास न्यायालयातून पळवून नेण्यासाठी जात असताना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या पथकाने नारेगाव चौकात दोन संशयित दुचाकीस्वारांना अडवले तसेच पाठीमागून आलेल्या तवेरा आणि सॅण्ट्रो कारलाही पोलिसांनी अडवले. पकडले जाण्याचा भीतीने दुचाकीस्वारांनी पोलिसांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रचंड फौजफाट्यासह असलेल्या पोलिसांनी घेराव घालून मध्य प्रदेश, खारगौनमधील सरुफ खान शकुर खान (45), नफिस खान मकसुद खान (40), नकीब खान रियाज खान (55), फरीद खान मन्सुर खान (35), शब्बीर खान समद खान (32), फैजुल्लाह गणी खान (37), शाकीर खान कुर्बान खान (40), तर संभाजीनगरातील नारेगावमधील शेख यासेर शेख कादर (23), किलेअर्वâ येथील सय्यद फैसल सय्यद एजाज (18), चंपा चौकातील मोहंमद नासेर मो. फारुक (24) यांना पकडण्यात आले. त्यानंतर जाहेदनगरातील मोहंमद शोऐब मोहंमद सादेक (28) अशा एकूण 11 जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एक रिव्हॉल्वर, नऊ जिवंत काडतुसे, 8 मोबाईल असा ऐवज जप्त केला.

कारागृहातच रचला होता कट
इम्रान मेहंदी खुनप्रकरणी पोलिसांनी 11 आरोपींना अटक केली होती. यातील खालेद चाऊश आणि मोहंमद शोऐब हे सध्या जामीनावर सुटलेले आहे. तसेच मध्य प्रदेश, खारगौनमधील सरुफ खान हाही 2016 मध्ये शस्त्र बाळगल्याप्रकरणी हर्सूल कारागृहात होता. कारागृहात असताना त्यांनी इम्रान मेहंदीला सोडवण्याचा प्लॅन रचला होता. ठरल्याप्रमाणे आज निकालाच्या अंतिम तारखेसाठी नेत असताना पोलिसांवर हल्ला करून मेहंदी यास सोडवण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांना पकडले. सरुफ खान याने मध्य प्रदेशातील तरुणांची सराईत टोळी तयार करून त्यांना कारने संभाजीनगरात आणले होते.

एकाला शिक्षा दुसऱ्याची निर्दोष मुक्तता
नगरसेवक सलीम कुरैशी याच्या खुनप्रकरणी जामीनावर असलेले हबीब खालेद मोहंमद ऊर्फ खालेद चाऊश आणि मोहंमद शोऐब मोहंमद सादेक हे दोघे सध्या जामीनावर सुटलेले आहे. अपहरणाच्या कटात दोघांचाही समावेश असल्याचे उघड झाले. आज न्यायालयाने खुनप्रकरणी निकाल दिला. यात खालेद चाऊश यास जन्मठेप तर शोऐब याची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने शिक्षा सुनावताच पोलिसांनी खालेद चाऊश यास ताब्यात घेतले तर अपहरणप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने शोऐब यास ताब्यात घेतले.

पथकाला प्रत्येकी पन्नास हजारांचे रिवॉर्ड
इम्रान मेहंदी याचा अपहरणाचा कट उधळून लावणाऱ्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक अनिल वाघ, अमोल देशमुख, सहायक फौजदार नंदकुमार भंडारी, सुभाष शेवाळे, नितीन मोरे, विजयानंद गवळी, मनोज चव्हाण, सय्यद अशरफ, संतोष सूर्यवंशी, हकीम पटेल, सिद्धार्थ थोरात, शिवाजी भोसले, भगवान शिलोटे, संजय जाधव, नवाब शेख, नितीन धुळे, दत्ता गडेकर, विरेश बन, ओमप्रकाश बनकर, धर्मा गायकवाड यांना पोलीस आयुक्त यांच्या तीन पथकाला प्रत्येकी 50 हजारांचे रिवॉर्ड उपायुक्त डॉ. दीपाली घाडगे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. पत्रकार परिषदेत उपायुक्त खाटमोडे पाटील, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांचीही उपस्थिती होती.