
सामना ऑनलाईन । लखनौ
सेल्फीवेडाने तमाम जनता पछाडलेली आहे. सेल्फी काढण्याच्या सवयीमुळे कधी सेल्फी काढावा याचंही भान त्यांना असत नाही. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये समोर आला आहे. लखनौमध्ये महिला पोलिसांनी रुग्णालयात बलात्कार पीडितेसमोर सेल्फी काढल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.
लखनौमधील किंग जॉर्ज मेडिकल विद्यापीठाच्या रुग्णालयात एका बलात्कार आणि अॅसिड पीडितेवर उपचार सुरू आहेत. या पीडितेच्या बेडजवळ बसलेल्या तीन महिला पोलीस सेल्फी काढतानाचा फोटो समोर आला होता. सोशल मीडियावरही हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी महिला पोलिसांच्या असंवेदनशीलतेवर टीका केली होती. या प्रकरणाची दखल घेत पोलीस महासंचालक सतीश गणेश यांनी फोटोमधील तीनही महिला पोलिसांच्या चौकशीचे आदेश दिले होते. प्राथमिक चौकशीनंतर महिला पोलिसांचं कृत्य हे असंवेदनशील असल्याचं निदर्शनाला आल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अलाहाबाद- लखनौ गंगा गोमती एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेला दोन अज्ञात व्यक्तींनी अॅसिड पिण्यास भाग पडले होते. महिलेवर हल्ला करणाऱ्या गुंडांनी यापू्र्वीही अॅसि़ड हल्ले केले आहेत. या नराधमांनी लक्ष्य केलेली ही चौथी महिला आहे. यापूर्वी त्यांनी लखनौजवळच एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता. या महिलेवरही बलात्कारानंतर अॅसिड हल्ला झाला होता.