नांदेड जिल्ह्यातील पोलीस नाईक कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

2

विजय जोशी । नांदेड

१९९३ पासून पोलीस नाईक या पदावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत पदोन्नती किंवा वेतनवाढ न झाल्याने नांदेड जिल्ह्यातील पोलीस नाईक कर्मचाऱ्यांत असंतोषाचे वातावरण पसरले असून, शासन निर्णयाप्रमाणे किमान बारा वर्षात एकदा तरी पदोन्नती व्हावी, असा नियम असताना नांदेड जिल्ह्यात मात्र हा नियम धाब्यावर बसविण्यात आला आहे.

पोलीस दलामध्ये पोलीस नाईक या पदावर कार्यरत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील किमान साडेतिनशे ते चारशे पोलीस कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत पदोन्नती मिळाली नाही. सलग बारा वर्ष एकाच पदावर काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी असा शासनाचा नियम आहे. मात्र जिल्ह्यातील एकाही पोलीस नायकांना गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून पदोन्नतीच मिळाली नाही. अन्य जिल्ह्यातून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ही पदोन्नती मिळाली, त्यांच्या वेतनवाढीत देखील भरपूर वाढ झाली. मात्र जिल्ह्यात कार्यरत असलेल्या व नियुक्ती मिळालेल्या पोलीस नाईक कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत पदोन्नती मिळालेली नाही. अनेकांना तर याच पदावरुन निवृत्त व्हावे लागले. मात्र त्यांना पदोन्नती मिळू शकली नाही. यामुळे जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आंध्रप्रदेशातील ४९ हजार ८७०, केरळमधील ४८ हजार कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पदोन्नत्या मिळाल्या. शैक्षणिक सुविधा, आरोग्य सुविधा याचेही लाभ मिळाले.वेतनवाढीचाही त्यांना फायदा झाला, मात्र नांदेड जिल्ह्यात पोलीस नाईक पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांना ना वेतनवाढीचा लाभ मिळाला, ना पदोन्नतीचा. याबद्दल काही पोलीस कर्मचाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे वैयक्तीक स्वरुपाचे अर्ज केले व आपल्यासह अन्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाबद्दल तक्रारीही केल्या. त्यावर कुठलाही निर्णय जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतला नाही. काही कर्मचारी तर २५ वर्षे झाली याच पदावर असून त्यांच्या निवृत्तीचही वेळ आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. अन्य जिल्ह्यातून आलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवा, अटी व शर्थीच्या नियमानुसार पदोन्नती मिळते. मग नांदेड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना का मिळत नाही, असा सवालही काही कर्मचाऱ्यांनी केला आहे. एक तर आमची कुठलीही संघटना नाही, त्यामुळे संघटीतपणे आवाज उठवणे देखील अशक्य आहे. म्हणजेच तोंड दाबून बुक्यांचा मार अशी अवस्था पोलीस नाईकांची झाली आहे. कर्मचाऱ्यांमध्ये पसरलेला असंतोष, कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनाला, तक्रारी अर्जांना केराची टोपली आजपर्यंत दाखविण्यात आली आहे. यामुळे पोलीस दलात नाराजीचा सूर दिसून येत आहे. या सर्व बाबीची गंभीरता लक्षात घेवून पोलीस नाईकांना पदोन्नती देण्यात यावी तसेच त्यांना वेतनवाढही देण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील पोलीस नाईक कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे केली आहे. जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेणाऱ्या पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या भूमिकेकडे आता पोलीस नाईकांचे लक्ष लागून आहे. वेळोवेळी झालेल्या तक्रार, निवारण सभेमध्ये वार्षिक तपासणीमध्ये पोलीस नाईकांनी या आपल्या व्यथा मांडल्या, मात्र त्यावर कुठलाही निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.