दगडफेकीत तीन पोलीस अधिकाऱ्यांसह दहा पोलीस जखमी

सामना प्रतिनिधी । निलंगा

आंदोलनकर्त्या जमावाकडून झालेल्या दगडफेकीत पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांसह तीन पोलीस अधिकारी व दहा पोलीस कर्मचारी मारहाणीत जखमी झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी नागरिकांनाही मारहाण केली व अनेकांना जखमी केले आहे. घरात घुसून केलेल्या मारहाणीत महिलाही सुटल्या नाहीत. या घटनेत ४० ते ५० दुचाकी व १० ते १२ चारचाकी वाहनाची तोडफोड करुन नुकसान करण्यात आले त्यामुळे पोलीसांनी दुपारनंतर रात्री ९ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.

निलंगा शहरात सकाळपासूनच अत्यंत शांततेत बंद सुरु होता. शहरातील बाजारपेठ, एस.टी. बस, शाळा, महाविद्यालये पेट्रोल पंप बंद असल्याने शहरात पूर्णपणे शुकशुकाट होता. दरम्यान आंदोलनकर्त्यांचा जमाव १० वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरुन घोषणा व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जात होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरील अनेक दुचाकी व चारचाकी वाहने अडवून तोडफोड केली. यामध्ये ४० ते ५० दुचाकी १० ते १२ चारचाकींचा समावेश आहे.

दरम्यान, आंदोलनकर्ते दापका वेशीतून अशोक नगरकडे जात असताना वाटेत दिसेल त्या वाहनाची तोडफोड करत होते व मारहाणही करत होते. यावेळी आंदोलनकर्त्यांना शांत करताना पोलीसांवर केलेल्या दगडफेकीत उपअधिक्षक गोपाळ रांजणकर, पोलीस निरीक्षक कल्याण सुपेकर, उपनिरीक्षक एम. एन. माशाळकर, पोलीस उपनिरीक्षक अघाव प्रियंका यांच्यासह दहा पोलीस कर्मचारी जखमी झाले. या सर्वांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी अश्रुधराच्या चार नळकांड्या फोडल्या. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी दापका वेस, कुंभार गल्ली, गांधी नगर, महादेव गल्ली, खाजगी या परिसरात धुडगूस घालत घरात घुसून महिलांनाही मारहाण केली. घरातील टि.व्ही. व इतर वस्तुंची नुकसान केले. त्याचबरोबर घराबाहेर थांबलेल्या वाहनांची तोडफोड केली. तेथे अनेक घरावर दगडफेक केली. यामध्ये निंबाळकर कुटुंबियांच्या ४ चारचाकी व ३ दुचाकी वाहनाचे अंदाजे ४ लाखाचे नुकसान झाल्याचे अजित निंबाळकर यांनी सांगितले. अमित भोज, राजू पवार, किशोर मोहळकर, विश्वधन शिंदे यांच्या वाहनांची मोठी नुकसान झाली आहे.