ब्लॅकमेलची तक्रार करणार्‍या मॉडेलवर पोलिसाचा ब्लॅकमेल करून बलात्कार

2

सामना ऑनलाईन । चंदीगढ 

चंदीगढमध्ये एका मॉडेलवर पोलिसानेच बलात्कार केल्याची खळबळजन घटना घडली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मॉडेलला एक तरुण तिच्या अश्लील छायाचित्रांवरून तिला ब्लॅकमेल करत होता. याची तक्रार तिने पोलिसांत केली होती. परंतु पोलिसाने हे छायाचित्र घेऊन मॉडेलला ब्लॅकमेल करत तिच्यावरच बलात्कार केला.

या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, मुंबईतल्या एका मॉडेलने गेल्या वर्षी चंदीगढमध्ये एका तरुणाची तक्रार केली होती. हा तरुण तिचा ओळखीचा असून त्यांच्यात चांगली मैत्री होती. या तरुणाच्या हाती मॉडेलचे काही आक्षेपार्ह छायाचित्र लागले. ही छायाचित्रे दाखवून तो तरुण तिला ब्लॅकमेल करत होता. आधी या तरुणाने मॉडेलकडून पैसे उकळले. नंतर या तरुणाने मॉडेलकडे शरीरसुखाची मागणी केली. तेव्हा घाबरलेल्या तरुणीने चंदीगढ मध्ये पोलिसांत तक्रार केली.

सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक नवीन फोगाटने याप्रकरणी तपास करून तरुणाला अटक केली. नंतर या तरुणाची ओळख पटवण्यासाठी मॉडेलला चंदीगढला बोलावले. त्यानुसार मॉडेल चंदीगढला दाखल झाली आणि आरोपीची ओळख पटवली. नंतर मॉडेल आपल्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी निघाली. तेव्हा रस्त्यात पोलीस उपनिरीक्षक नवीन फोगाटने आरोपीकडील मॉडेलची आक्षेपार्ह छायाचित्र दाखवून ड्रिंक घेण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर मॉडेल घाबरली आणि पोलिसाने सांगितले तसे केले. नंतर पोलिसाने हॉटेलच्या एका खोलीत मॉडेलवर बलात्कार केला. याबाबत कुठे वाच्यता केल्यास हे फोटो व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली.

नंतर मॉडेल मुंबईत परतली आणि याबाबत कुणालाच नाही सांगितले. पण एका लाचखोरीप्रकरणी नवीन फोगाटला निलंबीत करण्यात आले. ही बाब मॉडेलला कळाली तेव्हा तिने पोलिसांत फोगाट विरोधात तक्रार केली. नवीन फोगाट सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.