प्रेमप्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून महिलेनं केला हल्ल्याचा बनाव

सामना ऑनलाईन, मुंबई

सहा वर्षांनी लहान असलेल्या तरूणाशी असलेले प्रेमसंबंध उघडकीस येऊ नये म्हणून एका महिलेने आपल्यावर हल्ला झाला असा बनाव रचला. मात्र पोलीस तपासात ही बाब उघडकीस आली की या महिलेने स्वत:वर वार करून हल्ला झाल्याचं खोटं सांगितलं.

घटस्फोटीत असणाऱ्या आणि एक मुलगा असणाऱ्या या महिलेचे शेजारी राहणाऱ्या तरूणाबरोबर प्रेमसंबंध जुळले. हे दोघे नियमितपणे महालक्ष्मी इथल्या रेसकोर्सवर भेट होते. या दोघांनी वांद्रे कोर्टामध्ये लग्न करण्याचं निश्चित केलं. मात्र लग्नाच्या एक दिवस आधी तरूणाने या महिलेकडे लग्नासाठी आणखी अवधी हवा आहे असं सांगितलं. यामुळे संतापलेल्या महिलेनं पर्समधून सुरी काढून स्वत:वर वार करून घेतले. तरूणाने या महिलेला कसंबसं समजावलं आणि तो तिला नायर हॉस्पीटलमध्ये घेऊन गेला. आता प्रकरण अंगाशी येणार, प्रेमप्रकरणाविषयी सगळ्यांना कळणार या भीती महिलेनं अज्ञात व्यक्तीने आपल्यावर वार केल्याचं सांगितलं. यामुळे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाची पाहणी केली, महिलेची आणि तिच्या प्रियकराची चौकशी केली.

चौकशीमध्ये पोलिसांना ही सगळी गोष्ट कळाली. या तरूणाच्या घरच्यांना महिलेसोबतच्या प्रेमसंबंधांबाबत माहिती झाली होती, आणि त्यांनी या दोघांच्या लग्नाला नकार दिला होता.सुरूवातीला पोलिसांना एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाला असावा असा संशय होता मात्र सखोल चौकशीनंतर त्यांच्या हा सगळा प्रकार लक्षात आला.