पोलीस ठाण्यात भरवला राधे मां ने सत्संग, अधिकारी बनले भक्त

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

स्वय़घोषित गुरु म्हणून घेणारी व कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकलेली राधे मां दसऱ्याच्या दिवशी अचानक विवेक विहार पोलिस स्टेशनमध्ये आली. पोलीस स्टेशनमध्ये शिरताच तिने वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या खुर्चीचा ताबा घेतला आणि त्यात जाऊन बसली. पोलीस स्थानकातील अधिकारी, कर्मचारी तिच्या भक्तांप्रमाणे राधे मांच्या चरणी लीन झाले. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शर्मा याने तिची लाल ओढणी गळ्यात अडकवली आणि तिच्या बाजूला हात जोडून उभा राहीला.

स्थानकात हा सगळा प्रकार घडल्यानंतर पोलीस स्थानकाबाहेर राधे मां समोर हवालदारांनी भजन गायला सुरुवात केली. हे व्हिडिओ व्हायरल झाले असून यामुळे दिल्ली पोलिसांची जाम बदनामी होतेय. या प्रकाराबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं असता ते म्हणाले की, हा प्रकार अत्यंत गंभीर असून या प्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.

संजय शर्मा यांना या सर्व प्रकरणाचा जाब विचारला असता त्यांनी सारवासारव उत्तर देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, ‘राधे मां ही पोलीस स्थानकातील बाथरुमचा वापर करण्यासाठी आली होती. तिच्यासोबत तिचे १५-१६ भक्त देखील उपस्थित होते. मी औपचारिकता म्हणून तिला खुर्चीत बसण्यास सांगितले.’