सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यावर पोलिसांचा ‘यू टर्न’

ब्रिजमोहन पाटील । पुणे

शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांवर मंगळवारपासून हेल्मेटची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले होते. मात्र, रस्त्यावरील गर्दीत सरकारी नोकरदार ओळखायचे कसे आणि यावरून होणारी वाहतूक कोंडी, वाद याचा विचार करून पोलिसांनी या कारवाईला स्थगिती दिली आहे. सरकारी कार्यालयातील विभाग प्रमुखांशी संपर्क साधून प्रत्येक कार्यालयात जाऊन पोलीस जनजागृती करणार आहेत. त्यानंतरच ही कारवाई सुरू केली जाणार आहे, असे वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी स्पष्ट केले.

आम्ही ऑन ड्युटी आहोत आम्हाला सोडा; पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांची ट्रॅफिक पोलिसांना विनंती

पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशमं यांनी एक जानेवारी 2019 पासून पुण्यात हेल्मेटच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे, असे स्पष्ट केले. एकंदरीत हेल्मेट सक्ती होणार हे लक्षात आल्याने यास अपेक्षेप्रमाणे विरोध सुरू झाला. ही विरोधाची धार बोथट करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी कायद्याचे पालन करावे याप उद्देशाने मंगळवार पासून शासकीय नोकरदारांवर हेल्मेट व सीट बेल्टची कारवाई केली जाईल असे सह आयुक्त शिवाजी बोडखे यांनी स्पष्ट केले होते.

सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांना हेल्मेट सक्ती

पोलिसांनी पहिल्या टप्यात सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे जाहीर केले. परंतू, याच्या अंमलबजावणीमध्ये अनेक त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले. रस्यामध्ये सरकारी नोकरदार ओळखायचे कसे, गाडी आडवून प्रत्येकाकडे ओळखपत्र बघावे लागणार, त्यातून चौकाचौकात वाहतूक गाड्या थांबविल्याने होणारी वाहतूक कोंडी आणि पोलिसांशी वाद होण्याची शक्यता असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी यावर बैठक झाली. त्यात आत्ताच कारवाई करू नये असे ठरले आहे.

वाहतूक पोलिसांच्या 22 विभागातील सर्व सरकारी कार्यालयांमधील प्रमुखांशी पोलीस संपर्क साधणार आहेत. कार्यालयात जाऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना हेल्मेटच्या वापराबाबत माहिती देऊन त्यांचे प्रबोधन केले जाणार आहे. याबाबत पोलिसांना सुचना दिली आहे. त्यामुळे आत्ताच सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही. जनजागृती झाल्यानंतर एक जानेवारी किंवा त्याच्या पूर्वी काही दिवस आधी ही कारवाई सुरू होईल, असे उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.