मृतदेह शोधण्यासाठी समुद्री तज्ञांची मदत घेणार

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नौदलाच्या मदतीने गेले दोन दिवस वसईच्या खाडीत सर्च ऑपरेशन केले. मात्र पाणबुडे, लोखंडी हुकाने समुद्राचा तळ खरवडूनही मृतदेहाचा मागमूस लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी ही शोधमोहीम गुंडाळली असून आता नव्या अत्याधुनिक पद्धतीने शोध घेतला जाणार आहे. यासाठी समुद्राच्या तळाशी इंधनाचे साठे, मोठमोठ्य़ा ब्रीजसाठी खोदकाम करणाऱ्या कंपन्यांच्या तज्ञांची मदत घेतली जाणार आहे.

अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह शोधण्यासाठी वसई खाडीमध्ये नऊ तासांची शोधमोहीम घेण्यात आली. नौदलाच्या पाणबुड्य़ांनी वसई खाडी पुलानजीकचा सर्व परिसर पिंजून काढला. मात्र अश्विनी यांच्या मृतदेहापर्यंत त्यांना पोहोचता आले नाही. त्यामुळे आता अश्विनी यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांची मदत घेण्यात येणार आहे. समुद्रात काम करण्यात येणाऱ्या अनेक पेझे-केमिकल कंपन्यांकडे ही यंत्रणा उपलब्ध आहे, या कंपन्यांकडे तळापासून १० फूट खाली शोध घेणारे कॅमेरे असतात. अशाच एजन्सीकडे मृतदेह शोधण्याचे काम देण्यात येणार आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

समुद्रात काम करणाऱ्या अनेक एजन्सींकडे अत्याधुनिक कॅमेरे असून त्यांच्या माध्यमातून तळाच्या खालील भागातील वस्तूंचाही शोध घेतला जाऊ शकतो. अशीच अत्याधुनिक साधनसामग्री या शोधमोहिमेत वापरली जाणार आहे.

खटला जलदगतीने न्यायालयात चालवा

संपूर्ण पोलीस दलाला बदनाम करणाऱ्या अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाचा खटला जलदगतीने न्यायालयात चालविण्यात यावा. या हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आमदार सुजित मिणचेकर, सुभाष गोरे, संदीप कारंडे, सागर पुजारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दरम्यान याच मागणीसाठी हातकणंगले येथे स्थानिक रहिवाशांनी कडकडीत बंद पाळला.