अक्षरा हासनचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मित्राची होणार चौकशी

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रसिद्ध अभिनेता कमल हासन याची मुलगी व अभिनेत्री अक्षरा हासनचे काही खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता या प्रकरणी अक्षराच्या एका खास मित्राची चौकशी होणार आहे. लवकरच पोलीस त्या मित्राला चौकशीसाठी बोलवणार असल्याचे समजते.

अक्षराचे व्हायरल झालेले फोटो हे जुने असून तिने 2013 मध्ये हे फोटो क्लिक केले होते. त्यानंतर तिने तिच्या एका खास मित्राला हे फोटो पाठवले होते. त्यानंतर 2014 ला तिने नवीन फोन घेतला. त्यानंतर ते फोटो जुन्या फोनमध्येच राहिले. आता हे फोटो क्लिक केल्याच्या जवळपास पाच वर्षानंतर ते व्हायरल झाले आहेत. अक्षराने त्या जुन्या फोनचा आयएमईआय क्रमांक पोलिसांना दिला आहे. तसेच जिथून हा फोटो व्हायरल करण्यात आला त्या कॉम्प्युटरचा आयपी अॅड्रेस देखील शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

1 नोव्हेंबरला हे फोटो व्हायरल झाले त्यावेळी अक्षराने त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र नंतर तिने याविषयी मुंबई पोलिसांना ट्वीट करून या प्ररकरणात लक्ष घालण्यास सांगितले. पोलिसांनी हे प्रकरण सायबर क्राईमकडे सोपविले. मात्र 18 नोव्हेंबरला तिने याबाबत वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.