चालकाविना धावली पोलीस व्हॅन

सामना प्रतिनिधी । पुणे

शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नं. ३च्या समोर उभी केलेली पोलिसांची व्हॅन चालकाशिवाय अचानक सुरू होऊन पुढे गेली. त्या व्हॅनने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या एका जीपला आणि दुचाकीला धडक दिली. नागरिकांनी प्रसंगावधान राखून ही व्हॅन थांबविली. न्यायालयाच्या समोर ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नं. ३ समोर पोलिसांची व्हॅन उभी करण्यात आली होती. या व्हॅनच्या चालकाने गाडीला किल्ली तशीच ठेवली होती. त्यामुळे ही गाडी अचानक सुरू झाली आणि पुढे सरकू लागली. चालकाशिवाय गाडी पुढे सरकत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चालकाने व्हॅन थांबविण्यासाठी गाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी पुढे सरकत असल्यामुळे तोल जाऊन तो खाली पडला आणि त्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. गेटच्या समोर असलेल्या चहाच्या टपऱ्यावरील नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी व्हॅनने रस्त्याच्या कडेला उभारलेल्या दोन ते तीन दुचाकी आणि एका जीपला धडक दिल्यामुळे या गाड्यांचे नुकसान झाले.