व्यापाऱ्याला लुटणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून पाठलाग, अटक

maharashtra-police2

सामना प्रतिनिधी, नांदेड

वसमतच्या व्यापाऱ्याची सहा लाख 95 हजार 700 रुपयांची बॅग खंजीरचा धाक दाखवून पळवून नेणाऱ्या आरोपीला वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मधुकर टोणगे आणि दत्तराम जाधव यांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पॅराशूट खोबरेल तेलाचे वितरक मल्लिाकार्जून महाजन यांचा मुनीम सतीश वैजनाथ परसवाळे (32) हा जालना येथील व्यापारी प्रतिक जैन यांच्याकडून पॅराशूट तेलाची विक्री केलेली रक्कम सहा लाख 95 हजार 700 रुपये घेवून कालेजी टेकडी येथून जात असताना एका इसमाने त्यास खंजीरचा धाक दाखवून त्याच्याकडे असलेली पैशाची बॅग बळजबरीने हिसकावून घेवून जुनामोंढा भागाकडे पळ काढला. त्याचा पाठलाग सतीश परसावळे हे देखील करीत होते.

जुनामोंढा येथे वजिराबाद पोलीस ठाण्याचे कार्यरत असलेले कर्मचारी पोलीस नाईक मधुकर टोणगे व दत्तराम जाधव यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी सर्व बंदोबस्त बाजूला ठेवून त्याचा पाठलाग केला. त्याला ताब्यात घेतले. सदरची रक्कम सतीश परसवाळे यांची असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपी प्रमोद उर्पâ महेश रंगनाथराव मानेकर (23) रा. शितलामाता गल्ली इतवारा नांदेड याला वजिराबाद पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ सदरची रक्कम व धारदार पात्याचा खंजीर मिळून आला.

मानेकर यास वजिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सतीश परसवाळे यांच्या फिर्यादीवरुन जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोणगे आणि दत्तराम जाधव यांनी अत्यंत चाणाक्षपणे या आरोपीचा पाठलाग करुन त्यास पकडल्याने व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी मधुकर टोणगे व दत्तराम जाधव यांना दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करुन त्यांच्या कामाबद्दल अभिनंदन केले आहे.