पलानी स्वामी सरकार धोक्यात

सामना ऑनलाईन, चेन्नई

अण्णा द्रमुकच्या दोन गटांत कालच ऐक्य झाल्यानंतर पक्षाचे उप महासचिव दिनाकरण यांच्या १९ समर्थक आमदारांनी मुख्यमंत्री पलानी स्वामी यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. यामुळे या सरकारला धोका निर्माण झाला आहे. दुसरीकडे या सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडून आपले बहुमत सिद्ध करावे, असे आवाहन द्रमुकने केले आहे.

तामीळनाडू विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २३५ असून साध्या बहुमतासाठी ११८ आमदार आवश्यक आहेत. आज १९ आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढल्याने अण्णा द्रमुकच्या आमदारांची संख्या १३५ वरून ११६ वर आली आहे. त्यामुळे सरकार अल्पमतात आले आहे.

पनीरसेल्वम यांना उपमुख्यमंत्री करण्याबरोबरच त्यांच्याकडे अण्णा द्रमुकचे समन्वयकपद तर पलानी स्वामी यांच्याकडे पक्षाचे सहसमन्वयक हे पद देण्यात आले. कालच्या या घडामोडीनंतर या सरकारचा पाठिंबा मागे घेत असल्याची स्वतंत्र पत्रे या आमदारांनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे सादर केली आहेत. पलानी स्वामी यांनी माझ्याबरोबरच जनतेचा विश्वास गमावला आहे, म्हणून आपण हस्तक्षेप करावा अशी मागणी आमदारांनी आपल्या पत्रामधून राज्यपालांकडे केली आहे.

पलानी स्वामी हे चांगले काम करतील असा विश्वास असल्याने फेब्रुवारी २०१७ मध्ये १२२ आमदारांनी या सरकारला पाठिंबा दिला; पण हळूहळू या सरकारची काम करण्याची पद्धतच बिघडत गेली. आज या सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग होत असून या सरकारविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोपही झाले आहेत. याशिवाय चार महिन्यांच्या कार्यकाळात पलानी स्वामींविरुद्धचे भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आली, असेही या आमदारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

विधानसभेचे अधिवेशन बोलवा – स्टॅलिन

विधानसभेचे अधिवेशन त्वरित बोलावून सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.