राजकीय पक्षांनी खर्चासंदर्भात दिलेल्या निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे!

सामना प्रतिनिधी, नगर

लोकसभा निवडणूक काळात उमेदवार तसेच राजकीय पक्षांना दैनंदिन स्वरुपात खर्च अहवाल सादर करावा लागणार आहे, त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

द्विवेदी यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यांना खर्चविषयक नियमांची आणि आयोगाने घालून दिलेल्या नियम आणि सूचनांची माहिती दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा 38-शिर्डी (अ.जा.) लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, खर्चविषयक सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीकांत वनारसे, कोषागार अधिकारी महेश घोडके, महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातील लेखा अधिकारी विजय कोते यांच्यासह विविध मतदारसंघनिहाय नियुक्त करण्यात आलेले सहायक खर्च निरीक्षक उपस्थित होते.

संबंधित उमेदवारांना रोजच्या रोज खर्चाची माहिती देणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराचे स्वतंत्र खाते असणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने जिल्हा स्तरावर विविध बाबींसाठी ठरवून दिलेल्या दरकरारानुसार उमेदवारांच्या खर्चाची नोंद घेण्यात येईल. उमेदवारांनी त्यांच्या प्रचारासाठी केलेल्या खर्चाची माहिती वस्तुनिष्ठपणे देणे आवश्यक आहे. कोणत्याही स्वरुपात केलेल्या खर्चाची माहिती लपवू नका, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. निवडणूक लढवून इच्छिणार्‍या प्रत्येकाने अर्ज भरण्यापूर्वी एक दिवस अगोदर त्यांचे नवीन बँक खाते उघडणे आवश्यक आहे. निवडणूकीसाठीचा खर्च त्या बँक खात्यातूनच केला जाणे आवश्यक असल्याचे द्विवेदी यांनी स्पष्ट केले.

उमेदवाराचे संयुक्त खाते असणे आवश्यक आहे. जेणेकरून उमेदवार अथवा त्याच्या प्रतिनिधींना खर्चविषयक व्यवहार करणे अधिक सुलभ होईल, असे ते म्हणाले. उमेदवार स्वतःचे वाहन वापरत असेल तर त्याने तसे कळविले पाहिजे. मात्र, तसे कळविले नसेल, तर संबंधित वाहनभाडे आणि डिझेल खर्च त्याच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जाणार आहे. राजकीय पक्ष अथवा उमेदवारांमार्फत काढल्या जाणार्‍या वाहन प्रचारफेरी, मेळावा, मिरवणूक याचा खर्च त्यांनी नोंदवला पाहिजे. याशिवाय निवडणूक आयोगाने विविध पथकांची नियुक्ती केली असून त्यांचेही राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या खर्चाकडे लक्ष असणार आहे. निवडणूक यंत्रणेने भरारी पथक, व्हीडिओ टीम, खर्च नियंत्रण पथक स्थापन केले आहे. ही पथके अशा खर्चाकडे लक्ष ठेवून असणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी त्याची वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे ते म्हणाले. यावेळी सादरीकरणाद्वारे राजकीय पक्ष प्रतिनिधींना निवडणूक आयोगाचे खर्चासंदर्भातील नियम, कायदे, कायद्याचा भंग केल्यास होणारी कार्यवाही आदींची माहिती देण्यात आली.