पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस नरसंहार घडवेल; भाजपने व्यक्त केली भीती

9

सामना ऑनलाईन । कोलकाता

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला आहे. याआधीच्या सहा टप्प्यातही प. बंगालमध्ये हिंसाचार उफाळला होता. डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार निलंजन रॉय यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. बसीरहाट मतदारसंघात मतदान प्रक्रियेत तृणमूल काँग्रेसने गडबड केल्याचा आरोप भाजपने केला आहे. तृणमूल काँग्रेसला पराभव दिसत असल्याने पक्षाचे कार्यकर्ते हिंसाचार घडवत आहेत, असा आरोप भाजपने केला आहे. प. बंगालमधील वातावरण पाहता पराभवाच्या भीतीने ग्रासलेल्या तृणमूल काँग्रेसकडून मतदान संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात नरसंहार घडवण्यात येण्याची शक्यता वर्तवत भाजपने प. बंगालमध्ये निवडणूक निकालापर्यंत सशस्त्र दलाला तैनात ठेवावे अशी मागणी केली आहे. तर भाजपला शांततापूर्ण वातावरणात आणि नःपक्षपातीपणे निवडणूका घ्यायच्या नाहीत, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.

प. बंगालमध्ये याआधीच्या सहा टप्प्यातही मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. आजच्या सातव्या टप्प्यातही प. बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. तृणमूल काँग्रेसला पराभव दिसत असल्याने पक्षाचे कार्यकर्ते बेभान होऊन हिंसाचार घडवत आहेत. राज्यातील परिस्थिती पाहता तृणमूल काँग्रेस प. बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात नरसंहार घडवण्याची भीती केंद्रीयमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केली आहे. तसेच जनतेच्या सुरक्षेसाठी निवडणूक निकालापर्यंत पोलीस बंदोबस्त आणि सशस्त्र दल तैनात ठेवावे अशी मागणी केली आहे. जनतेने ममता बॅनर्जी सरकारला नाकारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते हिंसाचार घडवत आहेत. मतदारांना मतदान करण्यापासून टीएमसीचे कार्यकर्ते रोखत असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुरवातीपासूनच धमकी देत आहेत. त्यामुळे जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला याबाबतची तक्रार करणार आहे.

ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी निवडणूक लढवत असलेल्या डायमंड हार्बर मतदारसंघात भाजपचे उमेदवार निलांजन रॉय यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. जाधवपूर मतदारसंघात टीएमसी कार्यकर्त्यांनी गडबड केल्याचा आरोप भाजपने केला आहे. तेथे भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात येत आहे. तसेच चेहरा झाकून टीएमसी कार्यकर्ते बोगस मतदान करत असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते ठिकठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत असल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला आहे. टीएमसीने 52 मतदान केंद्रावर गडबड केली आहे. मतदानासाठी आलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यापासून रोखण्यात आले आहे. मथूरापूरमध्ये टीएमसी कार्यकर्त्यांनी बूथ कॅप्चरिंग केल्याचा आरोप होत आहे. प. बंगालमधील अनेक मतदान केंद्रावर मतदारांना रोखल्याचा आरोप होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या