जगबुडी नदीची दुरावस्था; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सामना प्रतिनिधी । खेड

खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीतील प्रदुषणात वाढ होत आहे. नदीकाठी कचरा फेकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तंबी नगरपालिका प्रशासनाने दिल्यानंतर जगबुडी नदीचे पात्र कचरामुक्त झाले होते. परंतू प्रशासनाचे दुर्लक्ष होताच पुन्हा जगबुडी नदीपात्राची कचराकुंडी झाल्याने जगबुडीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. जगबुडी नदीतील प्रदुषणामुळे नागरिकाच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.

नदीकाठी फेकला जाणारा कचरा आणि गटारांद्वारे नदीपात्रात सोडण्यात येणारे सांडपाणी यामुळे जगबुडी नदी पात्राची अक्षरशः कचराकुंडी झाली आहे. काही दिवसांपुर्वी याच प्रदुषणामुळे नदीच्या डोहात एका महाकाय मगरीचा मृत्यु झाला होता. या घटनेनंतर जगबुडी नदीतील प्रदुषणाचा प्रश्न चर्चेत आला. दरम्यानच्या काळात शहरात पसरलेल्या कावीळीच्या साथीचाही संबध नदीतील प्रदुषणाशीच जोडला गेला. या दोन घटनांनंतर नगरपालिका प्रशासनाने नदीकाठी कचरा फेकून नदीचे पात्र प्रदुषीत करणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तंबी दिली होती.

नगरपालिकेच्या इशाऱ्यानंतर काही काळ नदीकाठावर कचरा टाकण्याचे बंद झाले होते. त्यामुळे नदीचे पात्रही गाळमुक्त झाले होते. परंतू नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताच पुन्हा नदीच्या काठावर कचरा फेकण्यास सुरवात झाली आणि परिणामी जगबुडी नदीचे पात्र पुन्हा प्रदुषीत झाले आहे. नदी काठी कचरा फेकण्याचे बंद होत नाही तोपर्यंत जगबुडी नदी प्रदुषणमुक्त होणार नाही. नगरपालिका प्रशासनाने नदीकाठी कचरा फेकला जावू नये यासाठी कठोरातील कठोर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचं निसर्गप्रेमींकडून सांगितलं जात आहे.